सांगली : सोन्याची कर्णवेल गायब झाली. शोधाशोध सुरू असताना शेळ्यांनी गिळल्याची शंका आल्याने मिरजेतील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या पशू रुग्णालयात पोटाचे एक्सरे काढल्यानंतर शंका रास्त असल्याची खात्री पटली. अखेर शस्त्रक्रिया करून ३० हजाराची कर्णवेल शेळ्यांच्या पोटातून अलगद बाहेर काढण्यात आल्या.

मिरज तालुक्यातील सोनी येथील अशोक गाडवे या शेतकऱ्याच्या मुलीने घरात भांडी घासताना तिच्या दोन्ही कानातील काढून ठेवलेल्या सोन्याच्या दोन कर्णवेली भांडी धूत असताना खरकट्या भांड्यात पडल्या होत्या. हे खरकटे पाणी तेथे असलेल्या गाडवे यांच्या दोन्ही शेळ्यांसमोर ठेवल्यानंतर नेहमीच्या सवयीनुसार त्या शेळ्यांनी पाणी पिले. भांडी धुतल्यानंतर कर्णवेलींची आठवण आल्यानंतर शोधाशोध केली. खरकट्या पाण्यासोबत शेळींनीच या कर्णवेली गिळल्याचा संशय आला.

गाडवे यांनी मिरजेच्या शासकीय पशू रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय ढोके यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. पाच वर्षे वयाच्या दोन्ही शेळ्यांच्या पोटाचा एक्स-रे काढल्यानंतर दोन्ही शेळ्यांच्या पोटात धातूसदृश वस्तू असल्याची खात्री झाली. यामुळे डॉक्टर ढोके यांनी दोन्ही शेळ्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करून सुमारे ३० हजार किमतीची सोन्याची दोन कर्णवेल बाहेर काढली. चुकून सोन्याचे कर्णवेल गिळणाऱ्या शेळ्यांना मात्र शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही शेळ्यांची प्रकृती उत्तम असल्याचेही डॉ. ढोके यांनी सांगितले.