कराड : कराड तालुक्यातील गमेवाडीच्या कुंभार नावाच्या शिवारात वानरांच्या कळपापासून भुईमुगाची राखण करणारे पोपट जाधव या शेतकऱ्यावर बिबट्याने पाठीमागून झेप घेवून हल्ला केला. मात्र, पोपट जाधव यांचे नशीबबलवत्तर म्हणूनच ते या मृत्यूच्या दाढेतून बचावले.

डोंगरी भागात असलेल्या गमेवाडी येथे वानरे झुंडींनी येत विशेषतः भुईमुगाचे पीक लक्ष्य करीत असतात. भुईमूग हे आवडीचे खाद्य असल्याने ते भुईमुगाच्या पिकात घुसून शिवार मोकळे करीत असल्याने खबरदारी म्हणून पोपट जाधव हे आपल्या शेतातील भुईमूग पिकाची राखण करीत होते.

दरम्यान, वानरे धुमाकूळ घालत असल्याने त्यांना हुसकावण्यासाठी त्यांच्या बाजूकडे दगड भिरकावत असताना बिबट्याने पाठीमागून त्यांच्यावर झडप घातली. पहिल्यांदा पाटीवर व नंतर डाव्या हातावर व छातीवर पंजाचे घाव घालून लचके तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोठा आरडा- ओरडा होताना शेजारील शेतातील लोक धावून आल्याने पोपट जाधव यांची सुदैवाने सुटका झाली. पण, ते या जीवघेण्या हल्ल्यात घायाळ झाले. त्यांना गावचे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव तसेच राजेंद्र जाधव, सुरेश जाधव आदींनी तातडीने कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

हेही वाचा >>>“…ही सर्व नौटंकी आहे”, मनोज जरांगे यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय भेटीवर प्रकाश आंबेडकरांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंभीर जखमी पोपट जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्राने म्हटले आहे. या घटनेची खबर मिळताच वन परिमंडल अधिकारी बाबुराव कदम, वनरक्षक शंकर राठोड यांनी जखमी जाधव यांची समक्ष विचारपूस केली. निमित्ताने वन्य प्राण्यांच्या त्रासाचा आणि जीवघेण्या हल्ल्याचा गंभीर प्रश्न चर्चेत आला आहे.