कोल्हापूर : प्राचीन खोलखंडोबा शनी मंदिर परिसरातील जागा व त्यावरील वादग्रस्त बांधकाम प्रकरणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होऊन त्यांनी बांधकाम तत्काळ थांबविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार संबंधितांना काम थांबवण्याचे पत्र पाठवले असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी मंगळवारी दिली.
खोलखंडोबा मंदिराच्या बांधकामाचा विषय गेल्या काही कालापासून चर्चेत आहे. संबंधित वादग्रस्त जागेचे मंदिर व खासगी जागा यांचे एकत्रीकरण करण्याला स्थानिकांचा विरोध आहे. त्यातून हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र करंबे यांनी तक्रार केली होती. त्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मे महिन्यात सादर केलेल्या अहवालात रीतसर, पुरेशी परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. अहवालातील हा मुद्दा महसूलमंत्र्यांसमोर सादर करताना ही गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती.
दरम्यान, शनिवार पेठ, जुना बुधवार पेठ व शुक्रवार पेठ परिसरातील नागरिकांनी एकत्र येत ‘खोलखंडोबा मंदिर बचाव समिती’ स्थापन केली आहे. पुढील लढ्याचे नेतृत्व समितीमार्फत केले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देसाई यांनी दिली.
महानगरपालिकेने केवळ तीन मजल्यांच्या इमारतीस परवानगी दिली असताना प्रत्यक्षात सात ते आठ मजले उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या अनियमिततेसंदर्भात खोलखंडोबा मंदिर बचाव समिती महानगरपालिकेकडे कारवाईची मागणी करणार आहे.
यामुळे परिसरात खळबळ माजली असून, ऐतिहासिक खोलखंडोबा मंदिर परिसराचे धार्मिक व सांस्कृतिक अस्तित्व वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि हिंदू एकता आंदोलनकडून एकजुटीने लढा दिला जात असल्याचे देसाई यांनी सांगितले.