शनी शिंगणापूर येथे शनी मंदिरातील चौथ-यावर चढून एका युवतीने शनीचे दर्शन घेतल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेवरून राजकारण सुरू झाले असून मंदिर समिती विरोधकांनी रविवारी सकाळी गावबंद आंदोलन केले. त्याला गावक-यांनी संपूर्ण प्रतिसाद दिला आहे. मंदिर समिती विरोधात काही राजकीय पक्षांनी आवाज उठविल्याचे चित्र आहे.
शनी मंदिरातील चौथ-यावर महिलांना जाण्यास बंदी असतानाही एका युवतीने चौथ-यावर चढून तेल वाहून शनीचे दर्शन घेतले. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. हजारो भाविक यावेळी तेथे उपस्थित होते. तसेच सुरक्षारक्षकांनीही सदर प्रकार पाहिला. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी युवतीची अर्धा तास चौकशी केली आणि तिला सोडून दिले. मात्र, त्यानंतर शनी शिंगणापूर येथे राजकीय वातावरण तापले. सुरक्षा यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे हे घडल्याचा आरोप स्थानिकांनी केल्याने सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, या घटनेचे अंधश्रध्दा निर्मुलन समितीने आणि डाव्या विचारांच्या नेत्यांनी स्वागत केले आहे.