सांगली : काँग्रेस कार्यकर्त्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगत गळती रोखण्याचा प्रयत्न आ. डॉ. विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी केला. माजी नगरसेवकांची भारती हॉस्पिटलच्या विश्रामधाममध्ये बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी उभय नेत्यांनी हा दिलासा देत पक्षाची गळती रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपच्या गळाला आणखी कोणी लागू नये यासाठी आमदार डॉ. कदम, खासदार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

भारती हॉस्पिटलच्या विश्रामधामवर शनिवारी रात्री निवडक पदाधिकारी व माजी नगरसेवकांची गोपनीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, मिरज शहराध्यक्ष संजय मेंढे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार व खासदार यांनी प्रत्येक माजी नगरसेवकाशी वैयक्तिक संवाद साधून मते अजमावून घेतली. प्रभागामध्ये काय स्थिती आहे. आरक्षणानंतर काय स्थिती राहील, आरक्षित जागेसाठी कोण इच्छुक आहे याची विचारणा करण्याबरोबरच पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी तयारीत राहण्याचा सल्ला दिला. काही मंडळींनी पक्षांतर केले असले तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच, तुम्ही फक्त तयारी करा असेही सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्ष फोडून ताकद वाढविण्याचा प्रयत्न एकीकडे सुरू असताना काँग्रेस नेत्यांनीही आता हालचाली गतीमान केल्या आहेत. महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील असे सांगत डॉ. कदम यांनी याबाबत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही आश्वासन उपस्थितांना दिले.