छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात पवनचक्कीतून तांब्याची तार चोरीसाठी आलेल्या १५ ते २० जणांच्या टोळक्यांवर सुरक्षारक्षकाने रात्री दीड ते दोनच्या सुमारास केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. मृत चोर धाराशिव जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. चोरांनी तलवार आणि चाकूसह पवनचक्कीतील तांब्याच्या तारा चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता. त्यांनी दगडफेकही केल्याने नाईलाजाने गोळीबार करावा लागल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेमुळे बीड, धाराशिव जिल्ह्यात उद्योजकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी महिनाभरापूर्वी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. या वेळी पवन ऊर्जा प्रकल्पांमधील लोखंडी साहित्य आणि तांब्याच्या तारा चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे सांगण्यात आले होते. अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवा, सुरक्षारक्षक नेमा, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतरही चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नेकनूर पाेलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रसाद गोसावी म्हणाले की, ‘ओटू’ या कंपनीच्या पवनचक्कीच्या खांबातील तांब्याची तार काढण्यासाठी घुसलेल्या चोरट्यांवर ‘ओटू ’ सुरक्षा एजन्सीचे कर्मचारी रुपसिंग टाक यांनी गोळीबार केला. १५ ते २० जणांच्या समूहातील काही जण त्यांच्या अंगावर तलवारी व चाकू घेऊन येत होते. काहींनी दगडफेक केली. त्यामुळे गोळीबार करावा लागल्याची फिर्याद सुरक्षारक्षकाने दिली आहे. या प्रकरणातील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क झाला आहे. आरोपीची ओळख पटवणे बाकी आहे. मात्र, हे सारेजण धाराशिव जिल्ह्यातील आहेत.’
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘गोळीबारातील व्यक्ती मृत झाला आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल. या पूर्वीही पवनचक्कीतून तांब्याची वायर चोरी करण्याचे प्रकार घडले असल्याचे उद्योजक सांगत आहेत. प्रकरणाचा तपास सुरू आहे.