जालना : पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील तरुण वारकऱ्याचा नीरा नदीत बुडून मृत्यू झाला. गोविंद फोके (वय १८) असे तरुण वारकऱ्याचे नाव आहे. तो बुडाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या पार्थिवावर गुरुवारी जालना जिल्ह्यातील झिरपी (तालुका-अंबड) या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अकलूजपासून चार किलोमीटर अंतरावर मंगळवारी सकाळी नीरा नदीवर आंघोळीसाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला होता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान आणि पंढरपूर येथील आदिवासी कोळी मदत पथकाने त्याचा शोध घेतला. बुधवारी अकलूज पासून दोन किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील बुटखेडा (ता. जाफराबाद) येथील रतन श्रीराम नागवे (५५) यांचा अकलूज येथे दिंडी थांबली असताना हृदयविकाराने मृत्यू झाला. ते गेली पंचवीस वर्षे संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीत सहभागी होत असत. अकलूज येथे दिंडी थांबल्यावर जेवणानंतर शतपावली करण्यासाठी गेले असता ते चक्कर येऊन पडले. अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
धाराशिवमधील महिलेचा अपघातामध्ये मृत्यू
आषाढी वारीत पायी चालणाऱ्या उषा अशोक व्यवहारे यांचा वाखरीजवळ रात्री दीडच्या सुमारास रस्ता ओलांडताना अपघातामध्ये मृत्यू झाला. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील त्या रहिवाशी होत्या.