दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक कर्नल, एक मेजर आणि एक पोलीस उपअधिक्षक शहीद झाले. याच मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. तसेच जम्मू काश्मीरमध्ये तीन जवान शहीद झाले तेव्हा भाजपा कार्यालयात कशाचा आनंद साजरा केला जात होता, असा सवाल केला. ते शुक्रवारी (१५ सप्टेंबर) अहमदनगर आणि नाशिकच्या शेतकरी संवाद दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, “परवाचीच गोष्ट आहे. जेव्हा आपले तीन जवान जम्मू काश्मीरमध्ये शहीद झाले, तेव्हा भाजपाच्या कार्यालयात कशाचा आनंद साजरा केला जात होता, असा मलाही प्रश्न पडला. भाजपाने या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे.”

“शेतकऱ्यांना काहीही मदत मिळाली नाही”

राज्यातील दुष्काळ, पाऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “आत्ता पाऊस पडत असला, तरी पाऊस पडण्याआधीच ८० टक्के पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या नुकसान झालेल्या पिकांचं काय? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मागील वर्षीही नुकसान झालं त्याचे पंचनामे झाले. त्यावेळी मी, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे असे सगळेच फिरत होतो. मागील वर्षी अतिवृष्टी झाली, आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. मात्र, काहीही मदत मिळाली नाही.”

“पंचनामे होतील, पण पुढे काय?”

“यंदाही पाऊस पडायला सुरुवात झाली असली, तरी पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे पंचनामे होतील, पण पुढे काय? म्हणून माझा प्रश्न हाच राहील की, उद्या मराठवाड्यात मंत्रीमंडळ बैठक आहे. कदाचित आत भांडणं होतात तशी भांडणं होत राहतील. कारण सरकारमध्ये तीन वेगवेगळे गट एकत्र बसले आहेत. गद्दार गँगही त्यात आहेच,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केली.

हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बेछुट गोळीबार; चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी शहीद

“खोके सरकार महाराष्ट्राला धोके देत आलेलं आहे”

“महत्त्वाचं म्हणजे हे खोके सरकार महाराष्ट्राला धोके देत आलेलं आहे. ते महाराष्ट्रासाठी काय करणार हा प्रश्न पडतो,” असं म्हणत ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.