Aaditya Thackeray Dasara Melawa Speech: दसरा म्हटलं की सोनं लुटण्याचा दिवस मानला जातो. पण महाराष्ट्रासाठी दसरा म्हणजे मेळाव्यांचा दिवसही असतो. आज विजयादशमीच्या निमित्ताने मुंबईत एकाच वेळी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. एक शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा तर दुसरा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा. या दोन्ही मेळाव्यांमधून दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर आपल्या शैलीत टीका-टिप्पणी केली. पण यावेळी आदित्य ठाकरेंनी दसरा मेळाव्यातलं आपलं पहिलं भाषण केलं. या भाषणात त्यांनी एकीकडे सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करतानाच दुसरीकडे त्यांची नक्कल देखील केली. त्यामुळे राजकीय विरोधकांच्या नकला करून त्यांना लक्ष्य करणाऱ्या ठाकरे कुटुंबातील नेतेमंडळींच्या रांगेत आदित्य ठाकरे आपसूकच जाऊन बसले!

आदित्य ठाकरेंनी आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील पहिलं-वहिलं भाषण केलं. पण आपल्या भाषणात त्यांनी तुफान टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर खोचक शब्दांत टिप्पणी केली. “आधी हे भाजपावाले आपल्याकडे यायचे आणि सभा घ्यायचे तेव्हा ते भ्रष्टाचाराचे ए टू झेड काढायचे. ए फॉSSSर…, बी फॉSSSर, सी फॉSSSर.. पण आत्ता आपण पाहिलं, तर एकनाथ शिंदेंनी, मिंधे सरकारनं, भाजपानं, खोके सरकारनं महाराष्ट्रात भ्रष्टाचार करून लुटलंय. ए, बी, सी चे आकडे काढायचे झाले तर प्रत्येकी १०० भ्रष्टाचार निघतील”, अशी टीका त्यांनी केली.

एकनाथ शिंदेंचीही केली नक्कल!

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी मुंबईतील रस्त्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य केलं आहे. “मुंबईत दोन मोठे रस्त्यांचे घोटाळे झाले. गेल्या वर्षी मी रस्त्याचा घोटाळा उघड केला. १५ जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन मी पंतप्रधान मोदींना सांगितलं होतं की यात नाव तुमचं खराब होणार आहे. तुमच्याकडून भूमीपूजनं ज्या कामांची केली जात आहेत ती कामं पूर्ण होणार नाहीयेत. सहा हजार कोटींचा रस्त्यांचा घोटाळा जेव्हा मी उघड केला तेव्हा मुंबई महानगर पालिकेला ते मान्य करावं लागलं आणि १ हजार कोटी रुपये त्यातले कमी करावे लागले. तरीही ५ हजार कोटींचा घोटाळा शिल्लक राहतोच”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

त्यानंतर एकनाथ शिंदेंची नक्कल करत ते म्हणाले, “मुंबईत गेल्या दोन वर्षांत एक तरी रस्ता नवीन झालाय का सांगा. मी कुणाचंतरी भाषण ऐकलं होतं. दोन वर्षांsssत… मग परत शर्ट खाली खेचायचा…आणि म्हणूsssन… आणि म्हणून, आणि म्हणून.. आता आज किती वेळा म्हणणार आहेत माहिती नाही. पण असे म्हणत म्हणत आपल्याला जातीय दंगली किंवा इतर वादात व्यग्र ठेवून हे सरकार दररोज महाराष्ट्रातून खोक्यांवर खोके काढत आहे. गेल्या वर्षी रस्त्याचा घोटाळा होता. यावर्षीही त्यांनी सहा हजार कोटींचा रस्त्याचा घोटाळा केला आहे”, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

पालिका आयुक्तांना दिला इशारा

“मी आज मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांना सांगतोय की याद राखा जर तुम्ही या भ्रष्टाचाराच्या कागदांवर सही केली तर. एक तरी रुपया तुम्ही त्या कंत्राटदारांना, या खोके सरकारला दिला तर एका महिन्यात आमचं सरकार येत आहे. ते आल्यानंतर तुम्ही विचार करा, आत राहायचंय की बाहेर थांबायचंय”, असा थेट इशाराच आदित्य ठाकरेंनी पालिका आयुक्तांना दिला.

Eknath Shinde : “आम्ही घासून-बसून नव्हे तर ठासून…”, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना चिमटा

“एकही गोष्ट त्यांनी सोडलेली नाही. गणवेशात घोटाळा केला आहे. शाळेचे कितीतरी लाख गणवेश देणार होते. पण एक तरी गणवेश दिला आहे का? तेही दाखवलं.. म्हणे बघा बघा.. क्वालिटी आहे, स्टँडर्ड आहे वगैरे.. काय क्वालिटी, काय स्टँडर्ड?” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची नक्कल करून दाखवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपक केसरकरांची मिमिक्री…

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनंतर आदित्य ठाकरेंनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचीही नक्कल केली. “कोकणातील शिवरायांच्या पुतळ्यात एकनाथ शिंदेंनी घोटाळा केला. शिवरायांच्या पुतळ्यालाही त्यांनी सोडलं नाही. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यु ऑफ युनिटी आहे. कितीतरी फुटांचा तो पुतळा आहे. पण अजूनही तो तसाच आहे. पण आपल्या छत्रपतींच्या पुतळ्यात त्यांनी घोटाळा केला. ही भाजपा आणि हे मिंधे सरकार आहे. ते दुसरे एक चष्मा खाली करून बोलणारे मंत्री सांगतात.. यातून काहीतरी चांगलं निघेल. वाईटातून काही चांगलं निघेल”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनीही चष्मा खाली करून केसरकरांची नक्कल केली. “काय चांगलं निघेल यातून? महाराष्ट्र हे विसरणार नाही. तुम्हाला शिक्षा देणारच”, असंही ते म्हणाले.