मुंबईतील तीन टक्के घटस्फोट हे इथल्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे होत असल्याचं विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या विधानावरून जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर ‘सर्वे मंकी’च्या निष्कर्षांवरूनच आपण हे विधान केल्याचं अमृता फडणवीसांनी सांगितलं आहे. मात्र, आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांच्या या विधानावरून खोचक टोला लगावला आहे. जोगेश्वरी पूर्वच्या पूनम नगरमधील महापालिका शाळेतल्या बास्केटबॉल कोर्टचं उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर टोला!

ट्रॅफिकमुळे घटस्फोट होत असल्याच्या अमृता फडणवीसांच्या विधानावर आदित्य ठाकरेंनी खोचक निशाणा साधला. या विधानाविषयी विचारणा केली असता “मला वाटतं कॉमेडी आपण टीव्हीसाठी ठेवू. राजकीय मंडळी म्हणून आपण जे समाजकारण करत असतो, तेच आपण करत राहू”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. याआधी शिवसेनेकडून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील अमृता फडणवीस यांच्या या विधानावर टीका करताना “त्यांच्या या विधानावर हसावं की रडावं हेच कळत नाही”, असं म्हटलं होतं.

“अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे”, ३ टक्के घटस्फोट वाहतूक कोंडीमुळे होत असल्याच्या विधानावर शिवसेनेचा टोला!

काय होतं अमृता फडणवीसांचं विधान?

“मी एक सामन्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसतं, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसतं. मुंबईत वाहतूक कोडींमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही”, असं त्या म्हणाल्या होत्या. मात्र नंतर, “सर्वे मंकीच्या सर्वेक्षणातील निरीक्षणांवरूनच मी हे विधान केलं”, असा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला होता.

“मी जे सांगते, ते…”, अमृता फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण; मुंबईत ट्रॅफिकमुळे घटस्फोट होत असल्याचं केलं होतं वक्तव्य!

“महाराष्ट्र मॉडेल देश पातळीवर नेऊ”

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुंबई महानगर पालिका निवडणुकांसाठीच्या शिवसेनेच्या भूमिकेविषयी देखील भाष्य केलं. “इतकी वर्ष जे आमचे मित्रपक्ष होते, त्यांना कुठे धक्का लागू नये, म्हणून आम्ही लढलो नव्हतो. पण आता सगळीकडे लढत असताना आम्ही सगळीकडेच प्रचाराला जाणार आहोत. आपले मुख्यमंत्री गेल्या दोन वर्षात टॉप ५ मध्ये आले आहेत. हे फार कठीण आहे. गव्हर्नन्सचं महाराष्ट्र मॉडेल आम्ही देशभरात घेऊन जाऊ”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray mocks amruta fadnavis statement on divorce due to traffic in mumbai pmw
First published on: 05-02-2022 at 16:46 IST