मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी चालू आहे. दोन्ही गटातील विविध नेत्यांची साक्ष नोंदवली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यातील भाजपा आणि मिंधे सरकार देशातील लोकशाही मारायला निघालं आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सत्तासंघर्षाचा निकाल आमच्याच बाजुने लागेल आणि गद्दार आमदार (शिंदे गट) अपात्र ठरतील, अशी आम्हाला खात्री आहे, असंही आमदार ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- “अजित पवारांना मुख्यमंत्री करा, मी पाठिंबा देतो अन्…”, भास्कर जाधवांचं भाजपाला आव्हान

आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “सुनावणीदरम्यान घेतल्या जाणाऱ्या साक्षीवर मी काही बोलणार नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, मी पहिल्यापासून हेच सांगत आलो आहे की, याचा निकाल देशहितासाठी महत्त्वाचा ठरेल. आपल्या राज्यात लोकशाही पूर्णपणे गाडली आहेय आमची लढाई लोकशाहीसाठी सुरू आहे, आमच्यासाठी नाही. आमची लढाई देशाच्या संविधानासाठी सुरू आहे, आमच्यासाठी नाही.”

हेही वाचा- “अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही”, ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे पक्षांतर बंदी कायद्याचं आणि खोटं बोलण्याचं सरळ प्रकरण आहे. अपात्रतेचा निर्णय आल्यास हे सरकार पडणार आणि हे गद्दार (शिंदे गट) बाद होतील, याची आम्हाला खात्री आहे. गद्दारांच्या बाजुने निकाल लागला तर आपण हे समजायला पाहिजे की, आपल्या देशातील लोकशाही भाजपा आणि मिंधे सरकार मारायला निघालं आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.