Aaditya Thackeray Slams BCCI: शिवसेनेचे नेते, आमदार आदित्य ठाकरेंनी शुक्रवारी बीसीसीआयवर जोरदार टीका केली. सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानविरूद्ध सामना खेळण्यावर भारताने बहिष्कार घालावा, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र आता दोन्ही संघाचा सामना निश्चित मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा दाखला दिला आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत बीसीसीआयला लक्ष्य केले. “लाल किल्ल्यावरून आज पंतप्रधानांनी जे सांगितले, त्यापेक्षाही आपण वरचढ आहोत असे जर बीसीसीआयला वाटत असेल तर खरंच ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे जगाला पटवून देण्यासाठी केंद्र सरकारने आणि आपल्या देशाने इतके प्रयत्न केले, तरीही सशस्त्र दलांचं बलिदान, देश आणि अगदी पंतप्रधानांनीच सांगितल्याप्रमाणे “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही” ह्यापेक्षाही BCCI चा हव्यास वरचढ ठरतोय.”
“ICC मध्ये BCCI ची असलेली पत पाहता, “आम्ही आशिया चषकाच्या नियमांनी बांधलेलो आहोत”, असे म्हणणे हा एक विनोदच आहे!”, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. दोन्ही संघांनी स्पर्धेसाठी आपला संघ अद्याप जाहीर केलेला नाही. भारताचा पाकिस्तानविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये दमदार रेकॉर्ड आहे, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या १३ पैकी दहा सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान दोन्ही संघांमध्ये अखेरचा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान १२० धावांचे लक्ष्यही गाठू शकला नाही आणि त्यांना सहा धावांनी पराभव पत्करावा लागला.
आशिया चषक २०२५ स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक
९ सप्टेंबर (मंगळवार), अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग, अबुधाबी
१० सप्टेंबर (बुधवार), भारत विरुद्ध युएई, दुबई
११ सप्टेंबर ( गुरुवार), बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग, अबुधाबी
१२ सप्टेंबर ( शुक्रवार), पाकिस्तान विरुद्ध ओमान, दुबई
१३ सप्टेंबर ( शनिवार), बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, अबुधाबी
१४ सप्टेंबर (रविवार), भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
१५ सप्टेंबर ( सोमवार), युएई विरुद्ध ओमान, अबुधाबी
१५ सप्टेंबर ( सोमवार) श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग, दुबई
१६ सप्टेंबर (मंगळवार), बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
१७ सप्टेंबर (बुधवार), पाकिस्तान विरुद्ध युएई, अबुधाबी
१८ सप्टेंबर ( गुरुवार), श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
१९ सप्टेंबर ( शुक्रवार), भारत विरुद्ध ओमान, अबुधाबी
सुपर ४
२० सप्टेंबर ( शनिवार), ग्रुप बी क्वालिफायर १ विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर २, दुबई
२१ सप्टेंबर (रविवार), ग्रुप ए क्वालिफायर १ विरुद्ध ग्रुप ए क्वालिफायर २ दुबई
२२ सप्टेंबर (सोमवार) विश्रांती
२३ सप्टेंबर (मंगळवार) ग्रुप ए क्वालिफायर १ विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर २, अबुधाबी
२४ सप्टेंबर (बुधवार), ग्रुप ए क्वालिफायर १ विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर २, दुबई
२५ सप्टेंबर (गुरुवार), ग्रुप ए क्वालिफायर २ विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर २, दुबई
२६ सप्टेंबर (शुक्रवार), ग्रुप ए क्वालिफायर १ विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर, दुबई
२७ सप्टेंबर (शनिवार) विश्रांती
२८ सप्टेंबर (रविवार) अंतिम सामना