Aaditya Thackeray Fraud Voters Allegations: राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील वरळी डोम येथे शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी मतचोरीविरोधात सादरीकरण केले. यावेळी त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मतदार याद्यांमधील त्रुटी समोर आणल्या.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये एका खोलीचे घर पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी दावा केला की, निवडणूक आयोगाने या एका खोलीच्या पत्त्यावर ३८ मतदारांची नोंदणी केली आहे.
हा व्हिडिओ दाखवताना त्यांनी प्रश्न केला की, “या एका खोलीत किती लोक राहू शकतात? जास्तीत जास्त पाच. पण या खोलीच्या पत्त्यावर ३८ मतदारांची नोंदणी केली आहे. या ३८ मतदारांपैकी एकही व्यक्ती त्या खोलीमध्ये राहत नाही. आम्ही तिथे जाऊन पाहणी केली आहे. याप्रकारे वरळीत अशी २१४ घरे दाखवली आहेत, ज्यामध्ये ३३३५ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.”
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “निवडणूक आयोगाचा कायदा आहे की, जर १० हून अधिक लोक एका घरात राहत असतील, तर त्या घरात जाऊन तिथे खरोखरच १० हून अधिक लोक राहतात का, याची पाहणी करण्याची जबाबदारी मतदार यादी अधिकाऱ्याची आहे. मतदार यादी अधिकाऱ्यांनी याची पाहणी खरेच केली आहे का?”
या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या मतदार याद्यांच्या सादरीकरणानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भषण झाले. या भाषणात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळांबाबत जे सादरीकरण केले आहे, आपल्याला त्यामध्ये आणखी खोलात जायचे आहे, हे काम महाराष्ट्रभर करायचे आहे, पण याची सुरुवात मुंबईपासून करायची आहे. कारण मुंबईवर कोणाचा डोळा आहे हे तुम्हाला माहिती आहे. खासकरून दोन व्यापाऱ्यांचा मुंबईवर डोळा आहे. तुमच्या मनातील नावे मला माहिती आहेत, पण ते मी आता माईकमध्ये घेत नाही.”
