आम आदमी पक्ष लहान राज्यांच्या समर्थनार्थ आहे, विदर्भाचा प्रश्न हा गंभीर असून आम्ही सत्तेत आलो तर वेगळा विदर्भ करू, असे आश्वासन आम आदमी पक्षाच्या प्रवक्ता अंजली दमानिया यांनी दिले. काँग्रेस हा क्रमांक एक तर राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक दोन व भाजप हा क्रमांक तीनचा भ्रष्टाचारी पक्ष आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
येथील चांदा क्लब ग्राऊंडवर गुरुवारी आम आदमी पक्ष व शेतकरी संघटना युतीचे उमेदवार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या प्रचारार्थ आपचे संस्थापक अध्यक्ष अरिवद केजरीवाल यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु प्रकृती ठीक नसल्याने केजरीवाल ऐवजी आपच्या अंजली दमानिया आणि विजय पांढरे यांनी या सभेला हजेरी लावली. सभेच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलताना त्या पुढे म्हणाल्या, विदर्भाचा लढा देणाऱ्यांनी स्वत:च्या हिताकरिताच आजवर वेगळय़ा विदर्भाचा मुद्दा उचलला. मात्र, या प्रश्नावर काहीच केले नाही. ‘आप’ हा केवळ राजकीय पक्ष नसून एक आंदोलन आहे. काँगेस आणि त्यांचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँॅंग्रेसमुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. दोघांनी मिळून विकासाच्या नावावर आम आदमीची लूट केली आहे. जिल्हय़ात सर्वत्र विकासाच्या नावावर उद्योगांचा भर पडत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या उद्योगांना देण्यात आल्या आहेत, हा विकास करतांना शेतकऱ्यांचे मत कुणीही लक्षात घेतले नाही. आप हा आम आदमीचा पक्ष असल्याने निवडून आल्यास देशाचा विकास कसा करावा हे आम आदमी ठरवेल.
सत्ताधारी आणि विरोधक मिळून जनतेचे शोषण करीत आहे. देशात सर्वत्र भ्रष्टाचार पसरलेला आहे. आज देश अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. विकास निधीतील ५० टक्के निधीची लूट होत आहे, असे मत आम आदमी पक्षाचे नाशिकचे लोकसभा  मतदारसंघातील उमेदवार विजय पांढरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचेही ते म्हणाले. बारामती व गोंेदियाचा उल्लेख करीत राष्ट्रवादीवर आपला रोष व्यक्त केला. विकासासाठी निवडून देण्याचेही आवाहन पांढरे यांनी केले.
 येथील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच जनतेची लूट केली. आता जनतेने मतदान पेटीत मत टाकून सत्ताधाऱ्यांना झटका द्यावा, असे आवाहन अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रतिका शिंदे, रानू भिसे, प्रद्युम सहत्रबुद्धे, अ‍ॅड.राजेश विराणी, मयुर राईकवार, नंदा पराते, प्रवीण सहारे, योगेश आपटे, संतोषी जयस्वाल आदीं उपस्थित होते.

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल चंद्रपुरात येणार म्हणून दोन दिवसापासून येथे चांगला माहोल तयार झाला होता. केजरीवाल यांचे भाषण ऐकण्याची आम आदमीला उत्सुकता होती. परंतु ऐनवेळी केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्याने ते येथे जाहीर सभेसाठी येऊ शकणार नाही याची माहिती आपचे उमेदवार अ‍ॅड.चटप व कार्यकर्त्यांना रात्री उशिराच मिळाली होती. विविध चॅनेल्सवरून तसे दाखविण्यात सुध्दा येत होते. केजरीवाल येणार नाही हे रात्री व पहाटे कळल्याने अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळे जिल्हय़ातील बहुसंख्य लोक चांदा क्लब मैदानावर पोहचले नाही. तरीही चांदा क्लब मैदानावर लोकांची चांगली गर्दी झाली होती. केजरीवाल येणार म्हणून भव्य रोड शो, मिरवणुकीची तयारी केली होती. ही मिरवणूक निघाली मात्र त्यात उत्साह बघायला मिळाला नाही.