प्रारंभी लढणार म्हणून घोषणा आणि त्यानंतर नकार देणाऱ्या आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी अंजली दमानिया यांनी नागपुरातून भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा रविवारी पक्षाच्या नेत्यांनी केली. लोकसभेसाठी नागपूरमधून ३७ कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतरही गडकरींविरुद्ध लढण्यास त्यापैकी एकही लायक उमेदवार न मिळाल्याने नाईलाजास्तव आता दमानियांनाच नागपुरातून लढावे लागणार आहे. ज्येष्ठ समाजसेविका डॉ. रूपा कुळकर्णी यांनी निवडणूक लढण्यास संमती दिल्यानंतरही आणि त्यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
दमानिया यांनी प्रारंभी गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयारी दाखविली होती आणि तशी घोषणाही केली होती. मात्र, त्यानंतर नागपुरात आम आदमी पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आल्या असताना त्यांनी राज्याची जबाबदारी असल्याने गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढणार नसल्याचे पत्रकारांशी बोलताना जाहीर केले होते. त्यानंतर कम्युनिस्ट पक्षातून आम आदमी पक्षात गेलेल्या जम्मू आनंदसह ३७ कार्यकत्यार्ंच्या मुंबईत मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी अनेक जण निवडणूक लढण्यास इच्छुक होते. ज्येष्ठ समाजसेविका डॉ. रूपा कुळकर्णी यांची नागपुरात भेट घेऊन त्यांनाही आश्वासन देऊन कामाला लागा, असे सांगण्यात आले होते. मात्र, ऐनवेळेवर आपची यादी जाहीर झाल्यावर दमानिया यांच्याच नावाची घोषणा झाल्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांंमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंजली दमानिया यांनी गडकरी यांच्या विरोधात पूर्तीवरून यापूर्वी आरोप केले होते. त्यासाठी गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. गडकरी यांच्या विरोधात अनेक भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आता नागपुरातून त्या निवडणूक लढणार असल्यामुळे त्या पुरावे सादर करतील का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस, भाजप व आपमध्ये फरक तो काय? -डॉ. कुळकर्णी
डॉ. रूपा कुळकर्णी लोकसत्ताशी बोलताना म्हणाल्या, आपकडे उमेदवारी मागण्यासाठी मी गेलेली नव्हती. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे दहा-बारा वेळा आले. अनेकदा त्यांनी विनंती आणि आग्रह केला. भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात आपसारखा पक्ष चांगले काम करतो म्हणून होकार दिला. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे दूरध्वनीही आले. मात्र, आज दमानियांचे नाव नागपुरातून लढणार असल्याचे म्हणून जाहीर झाल्याने आश्चर्यच वाटले. दमानिया यांचे आधीच ठरले होते तर मला कशाला विचारणा करण्यात आली?. काँग्रेस, भाजपसारखे आपमध्ये जर सर्व पक्षश्रेष्ठीच ठरवत असतील तर अन्य राजकीय पक्ष आणि त्यांच्यात काहीच फरक नाही. हा फार्स कशाला केला? जनतेमधून आम्ही उमेदवार निवडतो, अशी केवळ घोषणा करायची आणि प्रत्यक्षात मात्र तसे वागायचे नाही. हा कुठला न्याय? दिल्लीवरून उमेदवारांची नावे घोषित करायची तर जनतेत जाण्याचे कारण काय, असा संतप्त सवालही डॉ. कुळकर्णी यांनी  केला. उमेदवारी मिळाली नाही, याचे अजिबात दुख नाही. मात्र, जे झाले ते मनाला पटण्यासारखे नसल्याचे त्या म्हणाल्या.
दमानिया बाहेरचे ‘पार्सल’ -खोपडे
अंजली दमानिया यांची नागपुरातून उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्या पुण्याच्या असल्यामुळे त्यांना जनतेकडून फारसा प्रतिसाद मिळणार नाही. ते बाहेरचे पार्सल असल्यामुळे पुन्हा जमानत जप्त करून परत पाठवू, असे मत भाजपचे शहराध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केले. दमानिया यांनी गडकरी यांच्या विरोधात कितीही आरोप केले तरी आजपर्यंत त्यांनी पुरावे मात्र सादर केलेले नाहीत. गडकरी यांच्या पाठिशी नागपूरकर जनता असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे खोपडे म्हणाले.