अक्षय गायकवाड ‘नाशिक श्री’चा मानकरी
सहभागी १० स्पर्धकांमधून बाजी मारत आशा थापा ही नाशिकरोड येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराज गायकवाड यांच्या पुढाकाराने आणि नाशिक बॉडी बिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पहिल्या ‘मिस फिटनेस’ स्पर्धेची मानकरी ठरली; तर ३९ व्या सीनिअर नाशिक श्रीचा मान अक्षय गायकवाडने पटकाविला.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. प्रशांत घोडेराव, आयोजक विलासराज गायकवाड, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, माजी नगरसेवक संजय भालेराव व शिक्षण मंडळ सदस्य बाबुराव आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पहिली मिस फिटनेस स्पर्धा अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडली. यामध्ये विजेत्या ठरलेल्या आशा थापाने अत्यंत तंदुरुस्तीचे सुंदर प्रदर्शन केले. किताबासह तिला ३३३३ रुपये रोख, सुवर्णपदक व आकर्षक चषक देण्यात आला. द्वितीय क्रमांक दुर्गा जाधव, तृतीय क्रमांक आकांक्षा गावंडे यांनी मिळविला. त्यांना संजय घोडेराव, सातपूरकर आणि कुसुमताई चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
३९ व्या ‘नाशिक श्री’ किताबासाठी अक्षय गायकवाड पात्र ठरला. अंतिम लढतीत अक्षयला हबीब सय्यद तसेच रवींद्र चव्हाण यांनी अटीतटीची झुंज दिली. पण अक्षयचा अनुभव आणि परिपूर्ण शरीरसौष्ठवामुळे किताबाचा मानकरी तोच ठरला. बेस्ट पोजरचा किताब नितीन बागूल तर मोस्ट इम्प्रूव्हड बॉडी बिल्डरचा किताब हबीब सय्यदला देण्यात आला. या स्पर्धेदरम्यान ‘मि. एशिया किताब विजेता’ सुहास खामकर याने मार्गदर्शन केले. नाशिक बॉडी बिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेसच्या वतीने खामकरसह ‘मि. वेस्टर्न इंडिया’ किताब मिळविणाऱ्या हितेश निकमचाही सत्कार करण्यात आला. लक्ष्मीकांत म्हात्रे यानेदेखील अफलातून शरीरसौष्ठवाचे प्रात्यक्षिक सादर केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बाबुराव आढाव, प्रशांत घोडेराव, संजय भालेराव, नगरसेविका ललिता भालेराव, हेमंत जाधव, गोविंद काळे, योगेश निकम आणि सुहास खामकर आदींच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन राजेंद्र सातपूरकर यांनी केले.