सोलापूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेत येणाऱ्या संतांच्या पालख्यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करून भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांच्या हातात आयते कोलित दिले आहे. यातून मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आमदार आझमी हे रविवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सध्या आषाढी यात्रेसाठी सुरू असलेल्या संतांच्या पालख्यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पालखी सोहळ्यामुळे रस्ता जाम होतो. रस्त्यावर हिंदूंचे इतर अनेक सण, उत्सव साजरे होतात. त्याबाबत कोणतीही मुस्लीम व्यक्ती वा संघटना अजिबात आक्षेप घेत नाही. उलट, स्वागत करते. परंतु, दुसरीकडे ईद सणात किंवा शुक्रवारी रस्त्यावर एका बाजूने दहा मिनिटांसाठी सामूहिक नमाज पठण केल्यावर त्याविरोधात काहूर माजविला जातो. त्या विरुद्ध प्रतिक्रिया म्हणून रस्त्यावर महाआरती केली जाते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांचा पासपोर्टच रद्द करण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे, असे वक्तव्य आमदार आझमी यांनी केले.
वादग्रस्त मंत्री नितेश राणे यांचा थेट नामोल्लेख टाळून आझमी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. विधिमंडळात आमदारकीची आणि नंतर मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेऊन सुद्धा हे मंत्री जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे उघडपणे भडकाऊ वक्तव्ये करतात. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साधे तोंडही उघडत नाहीत, याकडे लक्ष वेधून आमदार आझमी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबाबत भाष्य करताना त्यांनी इराणचे समर्थन केले. यापूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पॅलेस्टिनींना पाठिंबा दिला होता. यासेर अराफत यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र इस्त्रायल-इराण युद्धाबाबत जाणीवपूर्वक मौन पाळत आहे. अमेरिकेच्या दुटप्पी भूमिका घातक आहे. पंतप्रधान मोदी यांनी इराण आपल्या देशाला नेहमीच सहकार्य करणारा मित्र देश म्हणून पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे बंधू राजकारणात पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चेबद्दल बोलताना आझमी यांनी, दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तरीही शिवसेनेची ताकद न वाढता उलट घटण्याचीच जास्त शक्यता असल्याचे मत व्यक्त केले.