मंगळवारी सांगली महानगर पालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक खिशात असलेल्या भाजपला चकवा देत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हाती महापौरपद गेल्यामुळे भाजपला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजपची ६ मतं फोडून ती आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी वळवण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकीय धुरिणांना यश आल्यामुळे सांगली महानगर पालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. यानंतर स्थानिक पातळीवर भाजपच्या गोटामध्ये मोठा रोष निर्माण झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीची तळी उचलणाऱ्या ‘त्या’ सहा नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पक्षाकडून जाहीर करण्यात आलं आहे. पक्षाचे शहर जिल्हा प्रमुख दीपक शिंदे यांनी या नगरसेवकांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

५ वर्ष सत्तेचे भाजपचे आडाखे धुळीस मिळाले!

सांगली-मिरज आणि कुपवाड अशा संयुक्त महानगर पालिकेमध्ये एकूण ७८ जागा आहेत. यापैकी भाजपकडे ४१, काँग्रेसकडे २०, राष्ट्रवादीकडे १५ तर अपक्ष २ आहेत. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांनंतर २ अपक्षांसोबत सांगलीत भाजपनं सत्ता स्थापन केली. मात्र, महिला राखीव पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे महापौरपदासाठी पुन्हा निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधीपासूनच या निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपनंतर सांगलीत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापौरपद आले आहे.

जयंत पाटील यांची खेळी यशस्वी

नेमकं झालं काय?

ऐन मतदानाच्या वेळी भाजपची ६ मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय सुकर झाला. दरम्यान, जयंत पाटील यांच्या राजकीय खेळीमुळे संख्याबळ जास्त असून देखील काँग्रेसनं आधीच महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली.