सातारा: कर्तव्य बजावत असताना गुन्ह्यांचा तपास न केल्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, या दोन्ही पोलिसांकडे तब्बल २५ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित होता. आर. व्ही. पाटील आणि एस. ए. गावित अशी कारवाई केलेल्या पोलिसांची नावे आहेत. यातील एक पोलीस नाईक कर्मचारी २०१५ ते २०१९ दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि सध्या पोलीस मुख्यालय येथे सेवा बजावत आहेत. त्यांनी २ गुन्हे, १ बेपत्ता व्यक्तीचा तपास आणि ७ मृत्यू प्रकरणांचे तपास पूर्ण केले नाहीत.
दुसरे पोलीस कर्मचारी हे २०१८ ते २०१९ या काळात सातारा शहर पोलीस ठाण्यात होते आणि सध्या कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी ६ गुन्हे, ६ बेपत्ता व्यक्तींचा (मिसिंग) तपास आणि ३ मृत्यू प्रकरणांचे तपास पूर्ण केले नाहीत. वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, या दोन्ही पोलिसांकडे तब्बल २५ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित होता. या कारवाईमुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.
या दोन्ही पोलिसांना त्यांच्या वरिष्ठांनी अनेक वेळा लेखी आणि तोंडी स्वरूपात हे प्रलंबित तपास पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. असे असूनही, त्यांनी जाणीवपूर्वक हे गुन्हे प्रलंबित ठेवले. अखेर, बुधवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने तपास करण्याचा कटाक्ष असला पाहिजे. काही कर्मचारी बदली होऊन गेल्यावर त्यांच्याकडे सोपविलेली कामे पूर्ण करत नाहीत. काही पोलीस ठाण्यात अशी प्रकरणे तपासाअभावी अपूर्ण होती. ही अपूर्ण कामे त्रासदायक ठरत होती. अशी अपूर्ण कामे ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांना समज देण्यात आली होती. ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी काही वेळही देण्यात आला होता. मात्र, ही कामे पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. – तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सातारा.