सांगली : विवाह समारंभातील विविध विधींसाठी सुवासिनींना सन्मान देण्याची प्रथा प्रचलित असताना वांगी येथील सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्तेे परशराम माळी यांनी मुलाच्या लग्नातील हळद दळण्यासाठी विधवांना सन्मान देऊन वेगळा पायंडा पाडला.
ग्रामीण भागात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. अक्षतासाठी मुहूर्त पाहूनच विवाह सोहळा पार पाडला जातो. अक्षतापूर्वी हळदीचा कार्यक्रमही मुहूर्त पाहूनच केला जातो. हळद दळण्यासाठी महिलांचा पुढाकार महत्त्वाचा मानला जातो. हळद दळण आणि मुहूर्तमेढ रोवण्यासाठी विशिष्ट नावाची व्यक्तीही शोधली जाते. लग्नाची हळद कोणत्या आद्याक्षरावर आहे, त्या नावाच्या महिलेच्या हस्ते जात्याचे पूजन करून वधू-वराला लावण्यात येणाऱ्या हळदीसाठी दळण केले जाते. या विधीपासून विधवांना कटाक्षाने दूर ठेवले जाते.
मात्र, वांगी (ता. कडेगाव) येथील परशराम माळी यांनी मुलगा विजय माळी याच्या विवाह सोहळ्यात हळद दळणाच्या मुहूर्तासाठी विधवांनाच हा मान देण्याचा निर्णय घेतला आणि पै-पाहुण्याबरोबरच शेजारच्या महिलांना एकत्र बोलावून विधवा महिलांच्या हस्ते जातेपूजन करीत हळद दळणाचा विधी पूर्ण केला.या वेळी उपस्थित महिलांनी लग्न विधीतील गाणी म्हणून शुभेच्छाही दिल्या. माळी यांच्या या कृतीचे महिला वर्गाकडूनही जोरदार स्वागत झाले.