अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांचा कर चुकवला: आयकर विभाग

आयकर विभागाने सलग तीन दिवस सोनुच्या मुंबईतील घरी शोध घेतला होता.

Sonu Sood
अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला

अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला आहे, असं आयकर विभागानं आज एका निवेदनात म्हटलंय. आयकर विभागाने सलग तीन दिवस त्याच्या मुंबईच्या घरी जाऊन यासंदर्भात शोध घेतला होता. सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून परदेशी योगदान (नियमन) कायद्याचे उल्लंघन केले आहे, असंही आयकर विभागाकडून सांगण्यात आलंय.

“अभिनेता आणि त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता असलेल्या परिसरात शोध सुरू असताना, करचुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत. अनेक बोगस घटकांकडून असुरक्षित कर्जाच्या रूपात सोनूने त्याच्या बेहिशेबी उत्पन्नाचा मार्ग काढला होता. आतापर्यंतच्या तपासात अशा २० नोंदींचा वापर केल्याचं उघड झालंय. तसेच संबंधित सर्वांनीचं  बोगस नोंदी दिल्याची बाब स्वीकारली आहे. त्यांनी रोख रकमेच्या बदल्यात चेक दिल्याचंही मान्य केलंय. तसेच कर चुकवण्याच्या हेतूने खात्यांच्या पुस्तकात कर्ज म्हणून व्यावसायिक पावत्या छापल्या गेल्या असून त्याचा वापर गुंतवणूक करण्यासाठी आणि मालमत्ता घेण्यासाठी केला गेला आहे. आतापर्यंत एकूण २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर अशा पद्धतीने चुकवला आहे,” असे आयकर विभागाने सांगितले.

सोनुवरील आरोपांनुसार, करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान गेल्या वर्षी जुलैमध्ये स्थापन केलेल्या त्याच्या ना-नफा सूद चॅरिटी फाउंडेशनने यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत १८ कोटींपेक्षा जास्त देणगी गोळा केली होती. त्यापैकी १.९ कोटी रुपये त्याने लोकांची मदत करण्यासाठी खर्च केले आणि उर्वरित १७ कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात आहेत.

“लखनऊमधील एका इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या विविध परिसरातीस रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये सोनुने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. याठिकणी कर चोरी आणि पुस्तकांमधील अनियमित नोंदीशी संबंधित पुरावे सापडले आहेत. लखनऊच्या ग्रूपने बोगस बिलांच्या आधारे निधी वळवून गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत अशा ६५ कोटींच्या बोगस कराराचे पुरावे सापडले असून १.८ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे,” असंही आयकर विभागाने आज म्हटलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actor sonu sood involved in tax evasion of over 20 crore claims income tax department hrc

ताज्या बातम्या