उद्धव ठाकरे यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कबूल केलं होतं की, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाण्याची त्यांच्याकडून चूक झाली आहे, हिंदुत्वाचा विचार सोडण्यात चूक झाली आहे, असा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच केला आहे. यावर आता ठाकरे गटाकडून उत्तर आलं आहे. आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, “त्यांच्याकडे (दीपक केसरकर) लक्ष देऊ नका.”
दीपक केसरकरांच्या दाव्याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरे यांना सवाल केल्यानंतर आदित्य ठाकरे पत्रकारांना म्हणाले की, “ते (दीपक केसरकर) सध्या आमच्याबद्दल बोलत आहेत, परंतु त्यांनी स्वतः आतापर्यंत अनेकदा त्यांचं वक्तव्य बदललं आहे. ते तर माझ्या आजोबांकडे रोज हिंदुत्व शिकायला यायचे. त्यांचं तुम्ही काय ऐकताय. ते आता सांगतील की त्यांच्याकडून सर्वजण ट्युशन घ्यायला यायचे. जाऊदे! काही लोक असे बोलत राहतात, त्यांना सवय आहे, सोडून द्या.”
हे ही वाचा >> आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडे वरळीतून लढणार? मनसेची मोर्चेबांधणी
केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
दीपक केसरकर म्हणाले की, “आम्ही उद्धव ठाकरे यांना पुन्हा पुन्हा सांगितलं की, आजसुद्धा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची आघाडी तोडा, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. त्यामुळे कुणीही ठाकरे यांना फसवलेलं नाही. उलट उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून सांगितलं की, तुम्ही सगळे जण निघून जा आणि आता जनतेला उलटं सांगत आहेत, हे चुकीचं आहे. त्यांनी जनतेला वस्तुस्थिती सांगायला हवी.”