शिंदे गटाकडून हिंगोली आणि यवतमाळ-वाशीमचा उमेदवार बदलण्यात आला आहे. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी मागे घेत बाबुराव कदम कोहाळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर यवतमाळ वाशिममधून हेमंत पाटलांऐवजी त्यांची पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटाने भाजपाच्या दबावामुळे उमेदवार बदलली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे शिंदे गटाकडून आतापर्यंत तीन विद्यमान खासदारांचे तिकीटही कापण्यात आले आहे. यावरूनच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते अदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ‘ज्यांनी दिली साथ, त्यांचाच केला घात’ हे मिंधे गटाचे ब्रीदवाक्य आहे, असे ते म्हणाले. मुंबईत आयोजित ठाकरे गटाच्या मेळाव्या ते बोलत होते.

हेही वाचा – “हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नि…

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“मिंधे गटाने आतापर्यंत आठ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापैकी तीन उमेदवार त्यांनी बदलले आहेत, तसेच ते आणखी दोन उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ‘ज्यांनी दिली साथ, त्यांचाच केला घात’ हे मिंधे गटाचे ब्रीदवाक्य आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. “मिंधे गटाबरोबरच भाजपादेखील उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे. भाजपा शिवसेनेला ( उद्धव ठाकरे गट) घाबरली आहे. त्यामुळे भाजपाने मुंबईत सहापैकी दोनच उमेदार जाहीर केले आहेत”, असेही ते म्हणाले.

शेतीवरून मुख्यमंत्री शिंदेंना लगावला टोला

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेती करण्यावरूनही लक्ष्य केलं. “मुख्यमंत्री फक्त अमावस्या-पोर्णिमेला गावी जातात. बाकी कधी जात नाही, त्यांची शेती वेगळी असते”, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – श्रीकांत शिंदेंचे ‘कल्याण’; फडणवीसांची ठाण्यात ‘पाचर’, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला अस…

“मुंबईसह महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याच्या प्रयत्न”

“संपूर्ण राज्य आणि देशाचं लक्ष्य मुंबईतील सहा जागांच्या निकालाकडे लागलं आहे. आज देशात मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याच्या प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गेल्या दोन अडीच वर्षात राज्यात येणारे मोठे उद्योग गुजरातमध्ये वळण्यात आले. या उद्योगांमुळे मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळाला असता”, असेही ते म्हणाले.