सोलापूर : मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेल्या सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात एकाच वेळी ५५ कासवांचा मृत्यू झाला. तसेच हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी सोलापुरात धाव घेऊन या तलावाची पाहणी केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणाही जागी झाली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रश्नावर घेतलेल्या आढावा बैठकीत तलावातील पाण्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचा आदेश प्रशासनाला दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सिंचन उपचाराच्या (इरिगेशन ट्रीटमेंट) माध्यमातून तलावातील पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता वाढविण्याचा प्रस्ताव तयार करून येत्या १५ जूनपर्यंत कार्यारंभ आदेश द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. तलावातील पाण्याचा पीएच (पॉवर ऑफ हायड्रोजन) कमी झाल्याने ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन कासव आणि मासे मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती या बैठकीत देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवि पवार, संदीप कारंजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यटन विकास अंतर्गत सिद्धेश्वर तलावातील पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी एखाद्या खासगी एजन्सीची नियुक्ती करावी. सिंचन उपचाराच्या माध्यमातून पाण्याची शुद्धता करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवावे. ज्यामुळे तलावातील मासे, कासव आणि अन्य जलजीवांना धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी कृती आराखडा सादर करून येत्या १५ जून पर्यंत कार्यारंभ आदेश द्यावा आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्याची खात्री करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सिद्धेश्वर तलावात गेले अनेक दिवस बंद असलेले कारंजे पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. तलावात मिसळणाऱ्या दूषित पाण्यामुळे आणि वाढत्या जल प्रदूषणामुळे ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे. तलावात बाहेरून येणारे दूषित पाणी तत्काळ बंद करून तलावाचे पर्यावरणीय संवर्धन व्हावे, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.