महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी स्वत:च पुण्यातील सभेतून याबाबत माहिती दिली होती. तसेच लवकरच पायाची शस्त्रक्रिया करणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले होते. आता ते शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या १ जून रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी २४ तास आधी काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याने राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या वाहनांचा फौजफाटा नुकताच लीलावती रुग्णालयात पोहोचला आहे. बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात जमले आहेत. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे देखील रुग्णालयात पोहोचले आहेत.

राज ठाकरे यांनी यापूर्वीच पुण्यातील सभेतून पायाच्या दुखण्याबाबत माहिती दिली होती. दोन ते तीन महिने आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचंही त्यांनी सभेतून सांगितलं होतं. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी २४ तास आधी रुग्णालयात दाखल होणं आवश्यक असतं, याचं पालन राज ठाकरे यांच्याकडून केलं जात आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि अयोध्या दौऱ्यामुळे राज ठाकरे चर्चेत आले होते. मात्र उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदाराने राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. उत्तर प्रदेशमध्ये यायचे असेल तर अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागा अशी मागणी या भाजपा खासदाराने केली होती. त्यानंतर माझा दौरा अयशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप करत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता.