सांगली : भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर सांगली, मिरज शहरात जल्लोष करत साखरपेढे वाटप करण्यात आले. भारतीय जवानांचा जयजयकार करत भारत माता की जयच्या घोषणा देत आतषबाजी करण्यात आली.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर सरकारने द्यावे, अशी जनसामान्यांची भावना होती. गेली १० दिवस भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर दिले जाणार याची खात्री वाटत असतानाच मध्यरात्री पाकिस्तानात घुसून भारतीय सैन्य दलाने अतिरेकी प्रशिक्षण केंद्रावर हल्ले करत तळ उद्ध्वस्त केले. सैन्य दलाच्या या कृतीचे जोरदार स्वागत आज करण्यात आले.

सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन युवा शिवप्रतिष्ठानच्यावतीने जल्लोष करत साखर, पेढे, जिलेबी वाटण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी भारतीय सैन्य दलाचे कौतुक करत भारत सरकारने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याची मागणी केली. ठोस कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच भारताला मदत करणाऱ्या अमेरिका, जपान, इस्राइल, रशिया या देशाप्रती आभार मानले.यावेळी स्नेहा चौगुले, शीला चौगुले, विद्या साळुंखे, विद्या कुंभार, अंजली बोळाज, रंजना राजपुरोहित, कोमल जाधव, ऋग्वेदा पेटारे, नयना मोहिते आदी महिलांसह मोहनदादा शिंदे, संदीपराव जाधव, रामभाऊ जाधव, आनंदराव चव्हाण, अजिंक्य बोळाज, मारूती घोटगुडे, नितीन सोनंदकर, सुरेंद्र इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मिरज शहरात शिवसेना शिंदे गटाचे किरणसिंह रजपूत यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महाराणा प्रताप चौकामध्ये एकत्र येत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत फटाक्यांची आतषबाजीही केली.