अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर सोमवारी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
आंदोलनकर्त्यांनी जि. प. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात ९ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद, नागपूर खंडपीठांचा निकाल, तसेच ७ जून २०१२ व १९ ऑक्टोबर २०१३च्या पत्राचा संदर्भ देत खंडपीठाने दिलेल्या निकालाप्रमाणे कराड येथील १९ ऑक्टोबर २०१३चे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे पत्र, तसेच राज्यातील १८ हजार ६४५ अंशकालीन कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांना राज्य सरकारच्या धोरणात समायोजन करून सरळ सेवेत सामावून घेण्यात यावे, असे म्हटले आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २०००नुसार राज्यात १८ हजार ६४५ कला, क्रीडा, कार्यानुभव अर्धवेळ शिक्षकांची पदे ७ जुलै २०१२ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या पत्रानुसार भरण्यात आली. मात्र, सध्या या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे, तसेच कराड येथील फेरनियुक्तीच्या पत्रानुसार तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी पूर्वी केली होती. मागणीची पूर्तता न झाल्याने सोमवारी जि. प. कार्यालयासमोर शंभरावर आंदोलनकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत धरणे आंदोलन करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवेदनावर सतीश कावरखे, यशपाल खांदळे, भीमराव पठाडे, शकुराव वडकुते, भारत चोंढेकर, संदीप गायकवाड, प्रकाश हनवते, माधवराव साकळे आदींच्या सहय़ा आहेत.
उस्मानाबादेतही धरणे
अंशकालीन कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांना राज्य सरकारच्या धोरणात समायोजित करून सरळ सेवेत रुजू करून घ्यावे, या व अन्य मागण्यांसाठी कला, क्रीडा, कार्यानुभव नियुक्त शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी जि. प.समोर राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. आंदोलनात मोठय़ा प्रमाणात कला शिक्षक सहभागी झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2014 रोजी प्रकाशित
कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांचे धरणे आंदोलन
अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर सोमवारी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

First published on: 29-07-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation of arts sports work experience teacher in hingoli