अकोले: अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे भंडारदरा धरण आज, बुधवारी पहाटे भरले. धरणाचे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा धरण परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी व पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी भंडारदरा धरणातून २० हजार ७६३ क्युसेक विसर्ग सुरू होता.
पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे आज १७० मिमी पावसाची नोंद झाली. प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्यामुळे प्रवरा नदीवरील प्रसिद्ध रंधा धबधब्याने रौद्र रूप धारण केले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील लहान मोठे धबधबे पुन्हा जोमाने फेसळत कोसळू लागले आहेत.
तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे .त्यामुळे काल ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा असणारे ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमतेचे भंडारदरा धरण आज पहाटे पूर्ण भरले. धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी पहाटेपासूनच धरणाच्या संडव्यातून पाणी सोडण्यास सुरवात झाली.पहाटे असणारा १२ हजार २३१ क्युसेक विसर्ग सकाळी वाढवुन २० हजार ७६३ क्युसेक करण्यात आला. धरणाच्या सांडव्याची दोन्ही दारे २.८५ मिटर वर उचलण्यात आली आहेत. प्रत्येक दारातून ९ हजार ९६९ क्युसेक असे १९ हजार ९३८ क्युसेक पाणी नदीपात्रात सांडव्यातून पडत आहे तर वीजनिर्मितीसाठी ८२५ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
भंडारदरा धरणातुन प्रवरा नदीत सोडण्यात येत असणारे पाणी निळवंडे धरणात जमा होते तसेच कृष्णवंती ही प्रवरेची उपनदीही दुथडी भरून वाहत असुन निळवंडेच्या पाणलोट क्षेत्रातील ओढे नाले या पावसामुळे जोमाने वाहु लागले आहेत. हे सर्व पाणी निळवंडे धरणात येत असल्यामुळे या धरणाच्या पाणी साठ्यातही मोठी वाढ सुरू आहे. सकाळी निळवंडे धरणात सुमारे ताशी १६ हजार क्युसेक प्रमाणे पाणी जमा होत होते. तर अकरा वाजता धरणात होणाऱ्या पाण्याची आवक दर तासाला २२ हजार ४७० क्युसेक झाली होती.
सकाळी निळवंडे धरणाचा पाणी साठा ७ हजार २६६ दशलक्ष घनफुट (८७.२५टक्के) होता.धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्यामुळे हे धरण भरण्याच्या मार्गावर असून पाणी पातळी नियंत्रणासाठी या धरणातूही मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. सकाळी निळवंडे मधुन ८५० क्युसेक विसर्ग नदी पात्रात सुरू होता. नंतर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करीत अकरा वाजता तो ११ हजार ९१९ क्युसेक करण्यात आला. यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे.निळवंडे विसर्गत दिवसभरात मोठी वाढ अपेक्षित आहे.
भंडारदरा तसेच निळवंडे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रातील चल मालमत्ता, चीज वस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावीत. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जीवित वा वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसे भंडारदरा धरण जुलै महिन्यातच भरले असते.मात्र जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरण पूर्ण क्षमतेने भरू न देता धरणातुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागले.नंतर ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रातुन पाऊस जवळपास गायब झाला.त्या मुळे १५ ऑगस्टपर्यंत धरण भरण्याची अनेक वर्षांची परंपरा खंडित झाली १५ ऑगस्टला भंडारदरा येथे आलेल्या हजारो पर्यटकांची त्या मुळे काहीशी निराशा झाली.तीन दिवसांपूर्वी पाणलोटात पावसाचे पुनरागमन झाले.काल मुसळधार पाऊस कोसळला आणि धरण भरण्याची प्रतीक्षा संपली.
सकाळ पर्यंतच्या चोवीस तासात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे आहे.
आज पर्यंतचा एकूण पाऊस.
- भंडारदरा १०५ ( १ हजार ९७६ )
- घाटघर १६० ( ४ हजार २६)
- पांजरे १०५ (२ हजार ४१८)
- रतनवाडी १७० ( ४ हजार ११४)
- वाकी १०२ (१ हजार ७६).
हरिश्चद्रगड परिसरात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहु लागली आहे.सकाळी कोतुळ जवळ मुळा नदीचा विसर्ग २० हजार ४२८ कयुसेक होता.तालुक्याच्या पुर्व भागातही पावसाची संततधार सुरू आहे.