अहिल्यानगर: महापालिका निवडणुकीचे वेध लागल्याने सतर्क झालेल्या शहर भाजपने कचरा, घाणीचे साम्राज्य, भटक्या कुत्र्यांचा त्रास, बाजारपेठांतील अतिक्रमणे या समस्यांकडे लक्ष वेधत मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना घेराव घालण्याचे आंदोलन केले.
शहरातील कचरा रोज उचलला जात नाही, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, त्याची दुर्गंधी व रोगराई पसरत आहेत. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आयुक्तांच्या कार्यालयात कचरा आणून टाकण्याचा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस निखील वारे व माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी दिला.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, दोन – तीन महिन्यांपासून शहरात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. आयुक्त सांगतात की रोज दीडशे टन कचरा उचलला जातो, तरीही जागोजागी कचऱ्याचे ढीग कसे काय आहेत? अनेक प्रभागातून दैनंदिन कचरा संकलन होत नाही. या समस्यांवर तातडीने ८ दिवसांत उपाय करा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही. संगीता खरमाळे यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित करत, नागरीक व लहान मुले भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याकडे लक्ष वेधले. लवकरच नवरात्र, दसरा, दिवाळी सण येत असल्याने शहरातील सर्व बाजारपेठा अतिक्रमणमुक्त करा, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी शहर भाजपचे पदाधिकारी अजय चितळे, नीरज राठोड, मयूर ताठे, सोमनाथ जाधव, बाळासाहेब भुजबळ, गोपाल वर्मा, शिरीष जानवे, महेश गुगळे, विजय गायकवाड, अजित कोतकर, बाबासाहेब सानप, महेश तवले, रामदास आंधळे, अजित बोरुडे, पुष्कर तांबोळी, संपत नलावडे, मनोज दुल्लम, बंटी डापसे, महेश नामदे, विशाल खैरे, पल्लवी जाधव, अर्चना बनकर व दत्ता गाडळकर आदी सहभागी होते.
कचरा संकलनासाठी पुन्हा निविदा
यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, कचरा संकलनाच्या निविदा पुन्हा नव्याने काढाव्या लागणार आहेत. त्याची प्रक्रिया होत असून, शहरात कचरा उचलण्यासाठी ५५ गाड्या व १७ ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. श्वान निर्बिजीकरणाचे कामही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गटारींची सफाई नाही
नुकत्याच झालेल्या पावसाने शहराच्या अनेक भागात रस्त्यांवर पाणी साठून राहिले होते, अनेक ठिकाणी पाणी साठून रस्ते जलमय झाले होते. नालेसफाई झालेली नसल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे अनेक रस्त्यांवर चिखल पसरून ते निसरडे झाले. वाहनचालकांचे अपघात झाले. याकडेही महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.