अहिल्यानगर: जिल्हा परिषद गट आणि गणांच्या मतदारयादीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी असल्याची लेखी तक्रार निखिल शेलार, मुकेश झोडगे, सागर खरपुडे, राहुल शिंदे, महेश बोरुडे, किरण शेलार यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन दाखल केली.

नगर तालुक्यातील नागरदेवळे, वडारवाडी, बुऱ्हाणनगर आणि परिसरातील अनेक गावांमध्ये हजारो मतदारांची नावे चुकीची, दुबार आहेत तसेच मृत व्यक्तींची नावे मतदार यादीमध्ये कायम असल्याचे त्यांनी पुराव्यासह देत हरकती नोंदविल्या आहेत.

नागरदेवळे जिल्हा परिषद गट क्रमांक ४८, पंचायत समिती गण क्रमांक ९५ आणि केकती गण क्रमांक ९६ च्या प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक मतदारांच्या घर क्रमांकांच्या ठिकाणी ओ, एनए, पीएमटी अशा चुकीच्या नोंदी दिसून येत आहेत. तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अभिजित वांढेकर यांच्याकडे या संदर्भात लेखी हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.

नागरदेवळे जिल्हा परिषद मतदारयादीत सुमारे २६७१ मतदारांची नावे दुबार आढळली असून, ही नावे जेऊर आणि नागरदेवळे या दोन्ही गटात नोंदवली गेली आहेत. त्यामुळे मतदानाच्या वेळी दुबार मतदानाची शक्यता निर्माण झाली आहे तसेच पंचायत समिती गण ९५ व केतकी गण ९६ च्या प्रारूप यादीत १६३१ दुबार नावे असल्याचे निदर्शनास आल्याकडे तक्रारीत लक्ष वेधले आहे.

तक्रारदारांनी मतदारयादींचे सखोल सर्वेक्षण, पुनर्तपासणी आणि योग्य ती सुधारणा करण्याची मागणी केली आहे. मतदारयाद्यांतील त्रुटी दूर न झाल्यास आगामी निवडणुकांची पारदर्शकता धोक्यात येईल, असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे. संविधानाचे पावित्र्य राखण्यासाठी, उमेदवार आणि मतदारांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रशासनाने तातडीने सखोल तपासणी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व पारदर्शी मतदारयादी तयार करण्याच्या स्पष्ट मतदार नोंदणी यंत्रणेला सूचना द्याव्यात, असेही तक्रारदारांचे म्हणणे आहे.