अहिल्यानगर : महावितरण व नगरपंचायत यांच्या सावळ्या गोंधळात नेवासे शहराला आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर आंघोळ करण्याचा इशारा दिला. त्यासाठी नागरिक कपडे व बादल्या घेऊन नगरपंचायत कार्यालयात दाखल झाले होते. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी हस्तक्षेप करत दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मी नेवासकर संघटना व समर्पण फाउंडेशनच्या पुढाकारातून हे आंदोलन झाले. तत्पूर्वी नेवासा शहरातून जनजागृती करत नागरिकांचा मोर्चा नगरपंचायत कार्यालयावर नेण्यात आला. या संदर्भात माहिती देताना समर्पण फाउंडेशनचे डॉ. करण घुले यांनी सांगितले, की शहराच्या मध्यवर्ती भागाला आठ-आठ दिवस, तर उपनगरातून १५-१५ दिवस पाणीपुरवठा होत नाही.
पाणीपुरवठा योजनेसाठी महावितरणने एक्सप्रेस फीडर उभारल्याचे सांगितले जाते. मात्र, या एक्सप्रेस फीडरवरून अनधिकृत औद्योगिक वीजजोड महावितरणकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसभरात वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो. आजच्या आंदोलनात महावितरणने पाणीपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फीडर नसल्याचा दावा केला, तो अचंबित करणारा आहे. यासाठी नेवासा नगरपंचायतीने १९९८ मध्ये २७ लाख रुपये भरलेले आहेत. आता पुन्हा महावितरण स्वतंत्र फीडर उभारण्याचा प्रस्ताव देत आहे, तो चुकीचा आहे. औद्योगिक वापरासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर महावितरण विभागाने उभारावे व जुने एक्सप्रेस फिडर नगरपंचायतच्या पाणी योजनेसाठी ठेवावे. महावितरणच्या या संधीसाधूपणाचा आम्ही निषेध करतो.
नागरिकांकडून वर्षभराची पाणीपट्टी वसूल केली जाते, मात्र अर्धे वर्षही पाणीपुरवठा होत नाही, वारंवार आंदोलने करूनही नगरपंचायत व महावितरणकडून दखल घेतली जात नाही, असे ‘मी नेवासकर’ संघटनेचे शांताराम गायके यांनी सांगितले. सुधारित पाणी योजना सुरू करा अन्यथा आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही डॉ. घुले यांनी दिला. विकास चव्हाण, माजी नगरसेवक संदीप बेहळे, आपचे संदीप आलवणे यांनीही अधिकाऱ्यांना जाब विचारला.
अनिल सोनवणे, शिवा राजगिरे, शिवाजी गायकवाड, मनीष चव्हाण, प्रकाश चव्हाण, हारुण जहागीरदार, नावीद शेख, संपत लष्करे, अनंता डहाळे, रौफ सय्यद, राजू कणगरे, अश्फाक पठाण, संपत आळपे, यमुना रेलकर, शोभा अलवणे आदी उपस्थित होते. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष लांडगे व वीज महावितरणचे उपकार्यकारी अभियंता बडवे यांनी आठ दिवसांत पाणी व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.