राहाता : तालुक्यातील कोऱ्हाळे गावातील शेतकरी भरत सुभाष डांगे यांच्या घराच्या खिडकीतून प्रवेश करून साडेसहा लाखांचे सोन्याचे दागिने व रोख ६० हजार असा एकूण ७ लाख २० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी घरातून चोरून नेला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

कोऱ्हाळे गावातील डांगे वस्ती येथील भरत डांगे यांच्या घराची खिडकी अज्ञात चोरट्यांनी उघडून घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, गंठण व कानातील झुबे असे एकूण ६ लाख ६२ हजार ४०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ६० हजाराची रोकड देखील चोरून नेली आहे. चोरी झाल्याचे समजताच शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळी आलेल्या श्वानपथकाने काही अंतरापर्यंत माग काढला. परंतु, चोरटे वाहनातून पसार झाले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी वारंवार विजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा फायदा गुन्हेगार घेत आहेत. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कार्यपद्धती विषयी शहरासह ग्रामीण भागात नाराजीचे वातावरण आहे. भारत सुभाष डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पालकमंत्र्यांचे गाव असुरक्षित

जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावचे ग्रामदैवत असलेल्या म्हसोबा महाराज मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. यापूर्वीही या मंदिरातून दानपेटी फोडण्यात आली होती. या चोरीचा तसेच लोणी गावातील इतर घटनांचा तपास लागण्यापूर्वीच पुन्हा दानपेटी फोडण्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. चोरीचा तपास सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सुरू असून, परिसरातील फुटेज तपासले जात आहेत. रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सुरेश धावणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.