अहिल्यानगर : आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी तोफखाना पोलीस ठाण्यात गोंधळ घातला व पोलीस निरीक्षकांवर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या टेबलवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना तोफखाना पोलीस ठाण्यात आज, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यासंदर्भात पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीआरपीएफच्या जवानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बहिरू सूर्यकांत मगर (वय ३६, रा. जेऊर बायजाबाई ता. अहिल्यानगर) असे या जवानाचे नाव आहे. त्याने यापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात जागेच्या वादातून फिर्याद दिली आहे. आज सायंकाळी तो पोलीस निरीक्षकांच्या दालनात गेला. माझ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करा, अशी मागणी त्याने केली. आरोपीचा शोध घेत आहोत, आरोपी मिळताच अटक करू, असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.
त्यानंतर त्याने माझ्या भावाला गजराजनगरमध्ये उडविले आहे, माझा भाऊ आयसीयूमध्ये आहे, मी आत्महत्या करतो, असे म्हणत अचानक पोलीस निरीक्षकासमोरील टेबलवर तीन ते चार वेळा स्वतःचे डोके आपटून घेतले. तुम्ही माझ्या गुन्ह्यातील आरोपी अटक केला नाही, तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शासकीय अधिकाऱ्यास कर्तव्य बजावण्यासाठी दबाव आणणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे आदी कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.