अहिल्यानगर: जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या जिल्हाभरात हजारो मालमत्ता विखुरलेल्या आहेत. मोकळ्या जागा, इमारती, रस्ते यासह विविध स्वरूपातील या मालमत्ता आहेत. या मालमत्तांची कागदपत्रे, मोजमाप, नोंदणी, छायाचित्र, जीओ टॅगिंगसह तालुकानिहाय डिजिटल माहिती कोश जिल्हा परिषदेमार्फत तयार केला जात आहे. यामुळे या मालमत्तांच्या अधिकृत नोंदी ऑनलाईन पद्धतीने संकलनास प्रथमच सुरुवात करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेकडे सध्या जिल्ह्यात ६६ हजार ३०७ मालमत्ता आढळतात. गेल्या तीन दिवसात ३७७ मालमत्तांची कागदपत्रे, क्षेत्रफळ, छायाचित्र, जिओ टॅगिंगसह डिजिटल माहिती कोषात नोंदणी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या जागांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत, काही ठिकाणी जागा बळकावण्याचेही प्रयत्न झाले. इतर सरकारी विभागांकडेही काही जागा हस्तांतरित झाल्या आहेत. काही ताब्यात असूनही अधिकृत नोंदी आढळत नाहीत. या सर्व प्रकारात अधिकृतपणा आणून मालमत्तांची नोंदणी असणारा डिजिटल कोश निर्माण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पुढाकार घेतला आहे.

जिल्हा परिषदेकडे मालमत्ता केवळ अलिकडच्या काळातील नाहीत. त्यापूर्वीच्या जिल्हा लोकल बोर्डपासूनच्या आहेत. लोकल बोर्डच्या मालमत्ता पुढे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाल्या आहेत. शहरी भागात अनेक जागा मध्यवर्ती ठिकाणी आहेत. त्यामुळे या माहिती कोषास महत्त्व प्राप्त होणार आहे. दानशूर व्यक्ती शाळा, दवाखाने उभारणीसाठी जागा बक्षिसपत्र मिळते, या जागा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर वर्ग होणे आवश्यक असते. मात्र बांधकामे होतात तरी या जागा नावावर होत नाहीत. यामध्ये शिस्त निर्माण होणार आहे.

६६३०७ मालमत्ता

सध्या जिल्हा परिषदेकडे इमारती (नमुना ३९ मधील नोंद) ९०९३, रस्ते (नमुना ४० मधील नोंद) ३७७३, मोकळे भूखंड (नमुना ४१ मधील नोंद) ८६५२ अशा एकूण २१ हजार ५५८ मालमत्ता आहेत तर पंचायत समितीकडे ६०३४ व ग्रामपंचायतींकडे ३८ हजार ७५५ अशा एकूण ६६ हजार ३०७ मालमत्ता आहेत. जिल्हा परिषद स्तरावर सर्वाधिक मालमत्ता अकोले, श्रीगोंदे व संगमनेरमध्ये तर सर्वात कमी जामखेड, श्रीरामपूर व राहता तालुक्यात आहेत.

नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी प्रत्येक विभागावर आपापल्या मालमत्तांची डिजिटल कोषात नोंदणी होण्यासाठी स्वतंत्रपणे नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे तसेच तालुका पातळीवर पडताळणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

दि. ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार

जिल्हा परिषद मालमत्तांची ऑनलाइन नोंदणीची सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ३६६ मालमत्तांची कागदपत्रे, क्षेत्रफळ, छायाचित्र, जिओ टॅगिंगसह नोंदणी झाली आहे. त्यानुसार मालकी हक्काचे प्रमाणपत्र उपलब्ध केले जाणार आहे. या सर्व नोंदणी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. याचा उपयोग अधिकृत नोंदणी, मालमत्तांची सद्यस्थिती समजण्यास, अंदाजपत्रक तयार करण्यास होणार आहे. – दादासाहेब गुंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद