अहिल्यानगर : राजकीय इच्छुकांचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचना आज, सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. ७५ गट व १५० गणांची ही प्रारूप रचना आहे. दोन गट व चार गणांची गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढ झालेली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर आजपासून २१ जुलैपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने निवडणुका लवकरच मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. प्रभाग रचनेकडे राजकीय इच्छुकांचे लक्ष होते. गट, गण रचना कोणासाठी सोयीस्कर, कोणासाठी अडचणीची, कोणती गावे कोणत्या गट-गणात समाविष्ट झाली, याकडे काळजीपूर्वक पाहिले जात आहे.
प्रभाग रचनेसाठी सन २०१७ चेच निकष असल्याने फारसे बदल अपेक्षित नाहीत. तरीही राजकीय सोयीसाठी त्यावर हरकती दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कर्जत व जामखेडमध्ये प्रत्येकी एक गट व प्रत्येकी दोन गण वाढले आहेत. याची पुढील पायरी म्हणून आता आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष राहणार आहे. सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरूनच रचना करण्यात आली असली तरी २०१७ च्या तुलनेत काही बदल झाले आहेत का, याचीही तपासणी इच्छुकांकडून सुरू करण्यात आली आहे.
तालुकानिहाय गट व गणांची संख्या पुढीलप्रमाणे (कंसात गणांची संख्या)- अकोले ६ (१२), संगमनेर ९ (१८), कोपरगाव ५ (१०), राहाता ५ (१०), श्रीरामपूर ४ (८), नेवासा ७ (१४), शेवगाव ४ (८), पाथर्डी ५ (१०), अहिल्यानगर ६ (१२), राहुरी ५(१०), पारनेर ५ (१०), श्रीगोंदे ६ (१३), कर्जत ५ (१०) व जामखेड ३ (६).
(चौकट१ )
अंतिम प्रभाग रचना १८ ऑगस्टला जाहीर होणार
जाहीर झालेल्या गट व गणांच्या प्रभाग रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २८ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह, जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणार आहेत. या हरकतींवर ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी होऊन निर्णय घेण्यात येणार आहे. १८ ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल. १८ ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. हरकती जिल्हाधिकारी अथवा तहसील कार्यालयात दाखल करता येणार आहेत.
सर्वाधिक व सर्वात कमी लोकसंख्या
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक ५७६७२ लोकसंख्येचा गट राहाता तालुक्यातील तर सर्वांत कमी ३५६९० लोकसंख्येचा गट जामखेड तालुक्यातील आहे. गणामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला गण राहता तालुक्यात २८८३६ तर सर्वात कमी लोकसंख्या असलेला गण जामखेड तालुक्यातील १७८२४ चा आहे.