अहिल्यानगर: शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी बस व वाहने सुरक्षित असावीत, यासाठी प्रत्येक वाहनामध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीची बैठक झाली, त्यावेळी श्री. घार्गे बोलत होते. महापालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, चंद्रकांत खेमनर आदी उपस्थित होते.
श्री. घार्गे म्हणाले, प्रत्येक शालेय बस व वाहनामध्ये सीसीटीव्हीची सुविधा कार्यान्वित करण्यात यावी. ६ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या ने-आणीसाठी बस किंवा वाहनांमध्ये महिला कर्मचारीची नियुक्ती करावी. शालेय बसवर अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक स्पष्टपणे लिहावा.
अवैध वाहतुकीविरोधात संबंधित विभागांनी संयुक्तपणे मोहीम राबवून दोषी वाहनांवर तातडीने कारवाई करावी. विद्यार्थ्यांची चढ-उतार फक्त शाळेच्या वाहनतळावरच सुरक्षितपणे होईल, यासाठी सर्व बसेस तिथेच उभ्या कराव्यात. रस्त्यावर धोकादायक पद्धतीने चढ-उतार करू नये. प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापनाने जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी. तसेच सर्व शाळांनी परिवहन समितीच्या बैठका नियमित घेण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
‘आरटीओ’ची १९७ बसेसवर कारवाई
प्रादेशिक परिवहन विभागाने २३ व २४ जुलै असे दोन दिवस राबवलेल्या विशेष मोहिमेत १९७ अवैध वाहतूक करणाऱ्या बसेसवर गुन्हे दाखल करून १६ लाख ५७ हजार २५० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. विमा नाही, कर भरलेला नाही, परवाना नसलेली वाहने, आसन क्षमतेचे उल्लंघन, चालकाची अनुज्ञप्ती नसणे, बदल केलेली वाहने, इंडिकेटर्स, दिवे, परवर्तक दिशादर्शक नसलेली वाहने, वायू प्रदूषण निवारक तरतूदचा भंग, प्रवासी वाहनातून मालाची वाहतूक, बेकायदा प्रवासी वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर पथकाकडून कारवाई करण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गीता शेजवळ, सुरज उबाळे, कल्पेश सूर्यवंशी, चेतन दासनूर, सुदर्शन देवढे, हनुमंत पारधी, हर्षल जगताप, विलास धूम, सोनाली शिरसाठ, प्राजक्ता खोमणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.