अहिल्यानगर: जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने एमआयडीसीजवळील नवनागापूर येथे सुगंधी तंबाखू, मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करून पाच जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १४० किलो तयार मावा, ७२ किलो सुगंधी तंबाखू, ७० किलो कच्ची मावा सुपारी, यंत्रसामुग्री, मोटर असा एकूण ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नवनागापूर मधील आनंदनगर येथे ही कारवाई आज, मंगळवारी करण्यात आली. दत्तात्रय हजारे (रा. केडगाव), मंजीतकुमार विजयकुमार सिंग (मूळ रा. भोजपूर, बिहार, सध्या रा. आनंदनगर, नवनागापूर, एमआयडीसी), आकाश शिरसाठ (साईराजनगर, नवनागापूर, मूळ रा. चांदा, नेवासा), प्रशांत अशोक नवथर (पिंपरी शहाली, नेवासा) व महेश देविदास खराडे (जेऊर हैबती, नेवासा) या पाच जणांना अटक करण्यात आली.
हा कारखाना शुभम हजारेच्या मालकीचा होता. इमारतीच्या छतावरील पत्र्याच्या शेडमध्ये तो चालवला जात होता. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, शंकर चौधरी, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, सुनील पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, सुनील दिघे, अमोल कावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.