अहिल्यानगर: सध्या जिल्ह्याच्या दक्षिण भागाला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये किमान लाखभर शेतकरी भरडले गेले आहेत. असाच पाऊस मे महिन्यात झाला होता. त्याच्या मदतीचे १८ कोटी ९२ लाख ६६ हजारांची भरपाई राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. मात्र या मदतीपासून नगर तालुक्यातील शेतकरी अद्यापि वंचित राहिलेले आहेत.
यासंदर्भातील तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखालील, वाळकी (ता. नगर) परिसरातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन केली. यावेळी वाळकीतील शेतकरी गंगाधर जुंदरे, विठ्ठल कासार, तुकाराम जुंदरे, शकुंतला नारायण कासार, हरिभाऊ भालसिंग, नामदेव जुंदरे, अशोक भालसिंग आदी उपस्थित होते.
या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्हाभरातील २३ हजार ४४५ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यांच्या नुकसान भरपाईसाठी १८ कोटी ९२ लाख ६६ हजार रुपयांची भरपाई मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. ही रक्कम २२ जुलै २०२५ रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. याबरोबरच ऑगस्टमध्ये संगमनेरमध्ये आलेल्या पुराने १४० शेतकरी बाधित झाले होते. त्यांच्या भरपाईसाठी ६ लाख ३० हजाराची रक्कमही प्राप्त झाली आहे.
राज्य सरकारने भरपाईचा निधी मंजूर केल्यानंतर तहसीलदारांकडून यादी पडताळणी करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंत्रालय पातळीवर केवायसी पडताळणीसाठी पाठवली जाते. त्यानंतर भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.
यासंदर्भात माहिती देताना भाजप जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी सांगितले की २७ मेला वाळकी परिसरात झालेल्या पावसाने मोठे नुकसान केले. लहान-मोठी सुमारे २५० जनावरे मृत्युमुखी पडली. दुसऱ्या दिवशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. पंचनामे झाले. मात्र ज्यांचे सर्वाधिक नुकसान झाले, ते मदतीपासून वंचित आहेत. ज्यांचे थोडे नुकसान झाले त्यांना मदत मिळाली. वाळकी परिसरातील अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना देऊन मदत उपलब्ध करण्याचे आश्वासन दिल्याचेही भालसिंग यांनी सांगितले.
ओला दुष्काळ जाहीर करा
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन करणार असल्याचेही भाजप जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी सांगितले.