अहिल्यानगर : गेल्या चोवीस तासांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या १० तालुक्यांतील ८५२ गावांतील ३ लाख ८७ हजार ५२३ शेतकऱ्यांची २ लाख ६७ हजार ८३ हेक्टरवरील शेती पिके बाधित झाली आहेत. जिल्हा कृषी विभागाने हा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी जिल्ह्यात दोन दिवसांचा खंड वगळता दि. १३ ते २१ सप्टेंबर ११ तालुक्यांत अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा ८४ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

शनिवारी सायंकाळ ते रविवार सकाळपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने नगर तालुक्यातील ११७ गावांतील ३३ हजार शेतकऱ्यांची २१ हजार ८९८ हेक्टरवरील पिकांचे, पारनेर तालुक्यातील १३१ गावांतील ४८ हजार २८७ शेतकऱ्यांचे ३५ हजार ४४८ हेक्टरवर, कर्जत तालुक्यातील ४२ गावातील २५ हजार ८६ शेतकरी यांचे १६ हजार ५८ हेक्टरमध्ये, श्रीगोंद्यातील १०५ गावातील ६२ हजार ३३ शेतकरी यांचे ३५ हजार ३३५ हेक्टरवर, श्रीरामपूरातील ५५ गावातील २३ हजार ५६४ शेतकरी यांचे १५ हजार ६१६ हेक्टरवर, राहुरीतील ९६ गावांतील ५० हजार १६७ शेतकऱ्यांचे ४४ हजार ५६७ हेक्टरवर, नेवासातील १२७ गावांतील ३२ हजार ७८० शेतकरी यांचे १८ हजार ८१९ हेक्टरवर, संगमनेरमध्ये ३९ गावांतील ११ हजार ५९६ शेतकरी यांचे ९ हजार ३१७ हेक्टरवर, कोपरगावातील ७९ गावांतील ४५ हजार ७६२ शेतकऱ्यांचे ३३ हजार हेक्टरवर आणि राहाता तालुक्यातील ६१ गावांतील ५७ हजार ८३३ शेतकऱ्यांचे ३८ हजार ५५६ हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्के पेक्षा कमी अथवा अधिक नुकसान झालेले आहे.