कर्जत: संत गोदड महाराज रथयात्रेसाठी कर्जतमध्ये भाविकांचा जनसागर उसळला होता. दोन लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. गोदड महाराज रथयात्रेस अनेक वर्षांची परंपरा आहे. राज्यभरातील भाविक त्यासाठी दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार उपस्थित होते. त्यांनी एकत्रितच रथ ओढला. पोलीस विभागाच्या वतीने मानाच्या ध्वजाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यात्रेच्या पूर्वसंध्येला हरिजागर व सकाळी संगीत भजन आयोजित करण्यात आले होते. परिसरात ठिकठिकाणी संघटना, संस्था, मंडळांच्या अल्पोपहार, चहा, पाण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली होती. रथयात्रेच्या दिवशी वरूणराजाच्या आगमनाची परंपरा यंदाही कायम राहीली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भव्य अशा लाकडी रथात पांडुरंगाची मूर्ती ठेवून भाविक हा रथ ओढतात. रथाला ओटी लावण्यासाठी कौशल्य पणाला लावले जाते. नारळाचे तोरण अर्पण केले जात होते. अनेक गावातील दिंड्या घेऊन वारकरी पायी आले होते. वारकरी रथाच्या पुढे भजन, भारुडे, अभंग म्हणतात. ठिकठिकाणी फुगड्या खेळून हरिनाम केला जातो. यंदा व्यवस्था बदलल्याने रथमार्गावर वीजपुरवठा बंद करण्याची वेळ आली नाही, याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले. स्व. रामभाऊ धांडे यांच्या स्मरणार्थ कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला. यंदा वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देण्यात आल्याने कोंडी झाली नाही.