अहिल्यानगर: एमआयएम पक्षाचे खासदार अससुद्दिन ओवेसी यांची आज, मंगळवारी होणारी सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली. मात्र त्यावरून एमआयएमचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सभेचा प्रतिसाद पाहून घाबरलेल्यांनी शहरात तणावाचे षडयंत्र रचले, असा आरोप एमआयएमचे प्रदेश महासचिव समीर साजिद यांनी केला तर सभेला गर्दीच होणार नव्हती म्हणून सभा रद्द झाली, अशी टीका आमदार जगताप यांनी केली.

एमआयएमचे समीर साजिद यांनी सभा रद्द झाल्याची माहिती देताना आमदार जगताप यांच्यावर नाव न घेता आरोप केले. ते म्हणाले शहरात होणारी सभा पाहून काल तणावाचे वातावरण निर्माण केले. घाबरलेल्यांनी षडयंत्र रचले. शहराला कोण आग लावत आहे हे सर्वांना माहीत आहे. शहराचे आमदार संविधानाची शपथ घेऊन धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. मुस्लिम समाजाला शिवीगाळ करत आहेत. आम्ही समाज जोडण्याचे काम करतो. आमचा लोकशाही मार्गावर विश्वास आहे. या षडयंत्राची पोलिसांनी सखोल चौकशी करावी ओवेसी शहरात येऊ नयेत म्हणूनच ते घडवण्यात आले. आमदारांच्या वक्तव्यामुळे शहरात गुंतवणूकदार व पर्यटक येणार नाहीत.

आमदार जगताप म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून शहरात चिथावणीखोर फलक लावले गेले. पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांना चांगला धडा शिकवला. सभेला प्रतिसाद मिळावा म्हणूनच तणावाचे षडयंत्र निर्माण करण्यात आले. पोलिसांनी फलक कोणी लावले, त्यांना पैसे कोणी दिले, त्याची छपाई कोठे झाली, या सर्वांची चौकशी करावी. भगवा टिळा लावला म्हणून पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली. पुन्हा सभा झाली तरी लोकशाही मार्गाने घ्यावी, नगरच्या जीवनावर त्याचा परिणाम होऊ नये असेही ते म्हणाले.

आमदार जगताप-एमआयएमची मागणी एकच

माळीवाडा भागात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी रांगोळी काढणाऱ्या संशयीतास पोलिसांनी अटक केली होती, त्यामुळे पुन्हा कोठला चौकात आंदोलन करण्याची गरज नव्हती. या जमावाला तेथे कोणी नेले, आंदोलन करण्यास, दगडफेक करण्यास, पोलिसांना धक्का देण्यास कोणी भाग पाडले? वेगळे वळण लावण्यासाठीच हा जमाव तेथे नेला गेला. पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार जगताप आणि एमआयएमचे समीर साजिद या दोघांनीही केली. दोघांनी या मुद्द्यावर एकसारखेच मत व्यक्त केले.