अहिल्यानगर : महापालिकेने शहरातील धोकादायक अवस्थेत असलेल्या १९७ इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. यातील १६ धोकादायक इमारतींबाबत न्यायालयीन प्रक्रिया सध्या सुरू आहे तर १५ इमारती अति धोकादायक अवस्थेत असल्याचे मनपाच्या बांधकाम विभागाने स्पष्ट केले. या धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत.
नोटिसा बजावलेल्या १९७ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या इमारत मालकांनी दुरुस्ती अथवा धोकादायक भाग उतरून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी मालक व रहिवाशांना सूचना द्याव्यात, असेही आयुक्तांनी बजावले. मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी आज, गुरुवारी शहरातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे, संतोष इंगळे, शहर अभियंता, मनोज पारखे यांसह विभागप्रमुख उपस्थित होते. १५ अति धोकादायक इमारतींचा अद्यापही वापर सुरू असल्याचेही बैठकीत निदर्शनास आले. धोकादायक इमारती मालकांनी स्वतःहून काढून घ्याव्यात अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करा, गटारीच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करा आदी सूचना त्यांनी दिल्या. याबरोबरच मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना शहरातील झाडांच्या धोकादायक अवस्थेतील फांद्या काढाव्यात, धोकादायक झाडे काढावीत, पावसाळ्यात नाल्या, गटारी तुंबणार नाहीत या दृष्टीने त्यांची साफसफाई करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. गटारी, गटारीचे चेंबर दुरुस्ती, नागरिकांना पावसाळ्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. महापालिकेने यापूर्वीही मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना अति धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात कारवाई झालेली नाही. मालक व रहिवासी यांच्या वादातून या इमारतींमध्ये अद्यापी कुटुंबे राहत असल्याचे समजते.