अहिल्यानगर: महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर आठवडाभराच्या दिरंगाईने अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यास मान्यता दिल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात आली. प्रभागरचना अंतिम करताना क्रमांक ९, १५ व १६ या तीन प्रभागांत काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे शिवसेना शिंदे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) खेळी काही प्रमाणातच यशस्वी झाली आहे.

महापालिकेची अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली असून प्रभागरचनेचे नकाशे, व्याप्ती मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्याची मुदत १३ ऑक्टोबर होती, मात्र प्रत्यक्षात ती आज, सोमवारी म्हणजे २० ऑक्टोबरला सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली.

प्रारूप प्रभागरचनेवर ४३ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यातील एक हरकत अंशतः मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग १५ मधून प्रशांत सोसायटी परिसर व इतर भागाचे दोन ब्लॉग प्रभाग ९ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ ची लोकसंख्या २२ हजार ९१ झाली आहे. प्रभाग १५ मधून दोन ब्लॉक कमी झाल्याने सरासरी लोकसंख्या कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त लोकसंख्या प्रभाग क्रमांक १६ मधील शंकर महाराज मठ परिसर व अरुणोदय मंगल कार्यालय परिसर असे दोन ब्लॉक प्रभाग क्रमांक १५ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग १५ ची लोकसंख्या १८ हजार ३०४ व प्रभाग क्रमांक १६ ची लोकसंख्या २१ हजार ६१ झाली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात प्रारूप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांकडे घेण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर सर्व हरकती फेटाळण्यात आल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारच्या पातळीवर एक हरकत अंशतः मान्य करण्यात आली आहे. यासाठी महायुतीमधील तीन पक्षांमध्येच रस्सीखेच सुरू होती. प्रारूप रचना शिंदे गटासाठी अडचणीची ठरली होती.

राज्य शासनाच्या वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्याची मुदत होती. मात्र नगर विकास विभागानेच हे वेळापत्रक जाहीर केले होते व त्यांच्याकडूनच अंतिम प्रभागरचना २० ऑक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने या अंतिम प्रभागरचनेच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानुसार अंतिम प्रभागरचना मनपाकडून प्रसिद्ध करण्यात आली, असे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले.