अहिल्यानगर:जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा व १ नगरपंचायत अशा एकूण १२ नगरपालिकांसाठी एकूण २४८६ इतक्या विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बारा ठिकाणच्या नगराध्यक्ष पदासाठी २१४ तर सर्व ठिकाणच्या एकूण २८९ सदस्य पदांसाठी २२७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज, मंगळवारी दाखल झालेल्या उमेदवारांची छाननी होत आहे.
जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणच्या निवडणुकांमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये फटाफूट झालेली आहे. तरीही तुलनात्मक दृष्ट्या महाविकास आघाडी ही महायुतीच्या तुलनेत अधिक एकसंघपणे निवडणूक उतरली आहे. गेल्या सुमारे तीन ते सहा वर्षांपासून पालकांचे निवडणूक आराखडले आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सर्वांनीच उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले आहेत. त्यामुळे अर्ज माघारी नंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वर्चस्वाखालील शिर्डी व राहता तर काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वर्चस्वाखालील संगमनेर अशा तीन ठिकाणी महत्त्वपूर्ण लढती होणार आहेत. याशिवाय नेवासा नगरपंचायतसह कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, राहाता, देवळाली प्रवरा, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदे व जामखेड या नगरपरिषदांमध्ये निवडणूक होत आहे.
सर्वाधिक २९३ अर्ज श्रीरामपूर पालिकेसाठी दाखल झालेले आहेत. त्याखालोखाल श्रीगोंदामध्ये ३९२, शेवगावमध्ये २८१ अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात कमी १०७ अर्ज राहाता पालिकेसाठी दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक अर्ज नेवासामध्ये २७ तर श्रीगोंदामध्ये २६ अर्ज दाखल झालेले आहेत. सदस्य पदासाठी सर्वाधिक अर्ज श्रीरामपूरमध्ये २७४, श्रीगोंदा २६६, शेवगावमध्ये २५७ अर्ज दाखल झालेले आहेत.
पालिकानिहाय दाखल झालेले एकूण अर्ज पुढीलप्रमाणे- संगमनेर २९७, श्रीरामपूर २९३, कोपरगाव २३७, शिर्डी १४३, राहता १०७, देवळाली प्रवरा १३४, राहुरी १८२, पाथर्डी १७८, श्रीगोंदे २९२, जामखेड २४४, शेवगाव २८१ व नेवासा १९८.
श्रीगोंदामध्ये भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्र आले आहेत, मात्र त्यामधून शिवसेनेचा शिंदे गट बाजूला निघाला आहे. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे. त्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह निवडणुकीत असणार नाही. राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट, शरद पवार गट व काँग्रेस एकत्र येऊन त्यांनी शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. शेवगावमध्ये भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांनी यंदा नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
