अहिल्यानगरः गेल्या सुमारे दीड महिन्यापासून पक्षांतर्गत गट-तटातील वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे लांबणीवर पडलेल्या भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित अनिल मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपमधील विखे गटाकडूनच मोहिते यांचे नाव पुढे केल्याने विखे गटाने निष्ठावंतांवर एकप्रकारे मात केल्याचे मानले जाते.
भाजपकडून या पदासाठी शिफारशी मागवल्या होत्या. त्यामध्ये सचिन पारखी, बाबासाहेब वाकळे व बाबासाहेब सानप या तिघांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवली गेली होती तर विखे गटाकडून धनंजय जाधव यांचे नाव पुढे करण्यात आले होते. त्यातून शहर पक्ष संघटनेवर विखे गटाचे की निष्ठावंतांचे प्राबल्य निर्माण होणार, असा वाद निर्माण झाला होता. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी निष्ठावंतांच्या पाठीमागे पाठबळ निर्माण केले होते. मात्र विखे गटाकडून ऐनवेळी संघाशी निगडित अनिल मोहिते यांचे नाव पुढे करून निष्ठावंतांवर मात केल्याचे मानले जाते. अनिल मोहिते हे राजाभाऊ मुळे यांच्या वर्चस्वाखालील विचार भारती या संघटनेशी संबंधित आहेत. राजाभाऊ मुळे हे पूर्वी संघाशी निगडित असले तरी भाजपमधील निष्ठावंतांचा त्यांना विरोध आहे. त्यामुळे संघाची निगडित मोहिते यांची जिल्हाध्यक्ष पदावर वर्णी लागली तरी भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मोहिते हे श्रीलक्ष्मी मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी (बुरुडगाव) तसेच लक्ष्मी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी (केडगाव) या पतसंस्थांचे संस्थापक अध्यक्ष आहेत तसेच त्यांचा ढवळपुरी येथे कृषीनाथ ग्रीन एनर्जी हा खासगी साखर कारखाना आहे. या कारखान्याचे ते उपाध्यक्ष आहेत. याशिवाय सिंदखेड राजा (बुलढाणा) येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे ते कार्यकारी संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. केडगाव उपनगरातील एस. एस. मोहिते विद्यालयाचे संस्थापक, वसुंधरा कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे मुख्य प्रवर्तक आहेत. यशदाचा जलनायक हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.