अहिल्यानगर: जिल्ह्याच्या दक्षिण भागाला पावसाने पुन्हा अक्षरशः झोडपून काढले. २४ मंडलांत अतिवृष्टी झाली. पाथर्डीत आज सोमवार सकाळपूर्वीच्या चोवीस तासांत तब्बल ६.१ इंच (१५५ मिमी) पाऊस झाला. नगर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत तालुके पुन्हा जलमय झाले आहेत. शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुरात अडकलेल्या २२७ नागरिकांची सुटका करण्यात आली. पुराचे पाणी लगतच्या वसाहतीत घुसून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. घर पडून ३ जण जखमी झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

पुराच्या पाण्याने पाथर्डीतील पूल, रस्ते वाहून गेले आहेत. पावसाने दक्षिण जिल्ह्यातील जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणीच्या नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. दरम्यान, हवामान खात्याने जिल्ह्याला पुन्हा मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. धरणे, बंधारे, तलाव, ओसंडून वाहत आहेत, तर नद्या, ओढे-नाल्यांना ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्या आठवड्यात दक्षिण भागात सलग दोन दिवस ३२ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली, त्याचा फटका १.५ लाख हेक्टरमधील शेतीपिकांना बसला. आता पुन्हा दक्षिण भागालाच पावसाने झोडपले आहे. त्यामुळे नद्यांनी रौद्ररूप धारण केले होते.

पाथर्डीतील ९ पैकी ८ मंडलांत अतिवृष्टी झाली. तेथील टाकळी व खरवंडी या दोन मंडलात १५५ मिमी पावसाची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४८.१ मिमी (९८ टक्के) पाऊस झाला. सहा तालुक्यांत पावसाने सरासरीची शंभरी ओलांडली. सर्वांत कमी पाऊस कोपरगावमध्ये ६२.१ टक्के झाला आहे. जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यात ७९ टक्के झाला आहे. पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत आहे.

काल, रविवारी सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला, तो आज, सोमवारी सकाळपर्यंत सुरू होता. दुपारनंतर पुन्हा काही भागात पाऊस कोसळू लागला होता. नगर तालुक्यातील ५, पाथर्डी ८, शेवगाव ३, जामखेड ५, कर्जत १, श्रीगोंदे २ अशा एकूण २४ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

शाळांच्या सुटीचा निर्णय स्थानिक पातळीवर

हवामान विभागाने उद्या व परवा असे दोन दिवस येलो अलर्ट जारी केल्याने, तसेच पूर परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पाथर्डी, शेवगाव, जामखेड तालुक्यात दोन दिवस शाळांना सुटीचे अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत. मुख्याध्यापकांना परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांचे सतर्कतेचे आदेश

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली, तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांच्या स्थलांतरास प्राधान्य देण्याची सूचना केली आहे. मुसळधार पावसाने जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले असले, तरी जीवितहानी होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.

महामार्गावरील पुराच्या वेढ्यात दोन आराम बस

नगर शहराजवळील सोलापूर- जामखेड- पाथर्डी या बाह्यवळण रस्त्यावरील सारोळाबद्दी गावाजवळ दोन खासगी आराम बस पुराच्या पाण्यात अडकल्या होत्या. त्यामध्ये ७० प्रवासी होते. ते पुण्याहून नांदेडकडे जात होते. या बाह्यवळण महामार्गाला पाण्याचा निचरा होण्याची सोय नसल्यामुळे महामार्गावरच पूर आला होता. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने या सर्व प्रवाशांची आज पहाटे सहाच्या सुमारास सुटका केली. याशिवाय धनेगाव (जामखेड) येथे पुराने वेढलेल्या ४, पाथर्डीतील कारेगाव येथे पुरात अडकलेले ३ पिंपळगाव गव्हाणे येथील १, खरमाटवाडी २५, कोरडगाव ४५, कोळसांगवीत १२ व्यक्तींची सुटका करण्यात आली. खैरी नदीच्या पाण्याचा वेढा पडलेल्या वंजारवाडी (जामखेड) येथील ३०, खरडगाव (शेवगाव) येथील १२, आखेगाव २५ लोकांची प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुटका केली आहे.

अतिवृष्टी झालेली मंडले

अतिवृष्टी झालेली मंडले : नगर- कापूरवाडी, केडगाव, भिंगार, चिचोंडी, चास, श्रीगोंदे- मांडवगण, कोळगाव, कर्जत- मिरजगाव, जामखेड- जामखेड, खर्डा, नान्नज, नायगाव, साकत, शेवगाव- बोधेगाव, चापडगाव, मुंगी, पाथर्डी- पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, तिसगाव, खरवंडी व अकोला.

मोहटादेवी भाविकांना फटका

सर्वाधिक फटका मोठा पाथर्डीला बसला. तेथील कारेगाव, कोरडगाव, सोनटक्के वस्ती येथील पूल वाहून गेले. येळीच्या पुलालाही भगदाड पडले. कारेगावचा पूल पडल्याने मोहटादेवीकडे जाणाऱ्या भाविकांना फटका बसला. तेथे पूर आल्याने देवस्थानाने घटस्थापनेसाठी भाविकांनी येऊ नये, असे आवाहन केले होते. बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. दुलेचांदगाव, मोहरी, पिंपळगाव येथील संपर्क तुटला होता. पाथर्डी शहराकडे येणाऱ्या चारी बाजूच्या रस्त्यांना पाण्याने वेढल्याने रात्री संपर्क तुटला होता. अनेक वाड्यावस्त्या पाण्यात गेल्या आहेत. सर्वपित्री अमावास्येमुळे काल मढी गडावर भाविक मुक्कामास होते. त्यांना पावसामुळे आज दुपारपर्यंत अडकून पडावे लागले.

घर कोसळून ३ जखमी

सावरगाव (जामखेड) येथे मुसळधार पावसाने पहाटे घर कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गौतम बाबासाहेब गोरे (वय ४०), पत्नी सोनाली गोरे (वय ३५), मुलगा सार्थक (वय १४) हे जखमी झाले. झोपेत असतानाच घर कोसळले. गौतम गोरे हे गंभीर जखमी आहेत. तिघांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवले आहे.