अहमदनगर: गणेशोत्सवात व इतर सण – उत्सवात मंडप, स्वागत कमानी उभारणीसाठी महापालिका, महावितरण व शहर वाहतूक शाखेतर्फे संयुक्तपणे एक खिडकी योजनेचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी http://www.amcfest.in या संकेतस्थळावर गणेश मंडळांना विनाशुल्क परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारपासून परवानगीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली.

न्यायालयाच्या निर्देशानुसार, नियमांचे पालन करून उत्सव काळात मनपाकडून परवानग्या दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट करत आयुक्त डांगे यांनी सांगितले की, यापूर्वी अतिक्रमण निर्मूलन विभागात एक खिडकी योजना राबवली जात होती. मागील वर्षीपासून स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यावरून परवानग्या दिल्या जात आहेत.

यंदाही संकेतस्थळावरून परवानग्या दिल्या जाणार आहेत. मात्र, जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी गणेश मंडळांना त्यांच्या स्तरावर घ्यावी लागणार आहे. उत्सव काळात मंडपाची उंची ४० फुटांपेक्षा जास्त नसावी. ४० फुटांपेक्षा जास्त उंचीचा मंडप उभारणार असल्यास सुरक्षिततेसाठी अधिकृत स्थापत्य अभियंत्यांचे प्रमाणपत्र जोडावे, मंडप व स्वागत कमानी उभारताना आपत्कालीन गाड्या जाण्यासाठी रस्ते मोकळे ठेवावेत. गणेशोत्सव संपल्यानंतर तीन दिवसांत मंडप, कमानी, देखावे, बांधकाम हटवावे. मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेल्या मंडळांनी मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मंडप, कमानी काढावेत, मंडपासाठी रस्त्यावर खड्डे करू नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असेही आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पर्यावरण विभागाने दिलेल्या प्रदूषण नियंत्रण सूचनांची अंमलबजावणी करावी. मूर्ती शाडू मातीच्याच वापराव्यात. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे. मंडळाने सर्व परवानग्या दर्शनी भागात लावाव्यात, असे आवाहन मनपाने केले आहे.

गणेशोत्सवाचे सार्वजनिक तरुण मंडळांना वेध लागले आहेत. त्याची पूर्वतयारीही सुरू आहे. ढोल वादनाचे सराव ठिकठिकाणी रंगू लागले आहेत. शहरात गणेशमूर्ती उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतात. विक्रीसाठी ते परजिल्ह्यात पाठवले जाऊ लागले आहेत. महापालिकेने मंडप उभारण्यासाठी नियमावली तयार केली असली तरी सार्वजनिक तरुण मंडळे रस्त्यात अडथळा होणारी मंडप उभारतात. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा होतो.

परवानगी दिल्यानंतर प्रत्यक्षात त्याप्रमाणेच मंडप उभारला जातो की नाही याची पाहणी महापालिकेकडून होत नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरलेलाच असतो. किमान पंधरा दिवस आधीपासूनच रस्त्यात मंडप टाकण्यास सुरुवात होते. शहरात सध्या तर ठिकठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम शहरात सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण होणार का असाही नागरिकांना प्रश्न पडला आहे. ऐन गणेशोत्सवात रस्ते तयार करण्याचे काम सुरू ठेवल्यास वाहतुकीला मोठा अडथळा ठरणार आहे.