राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. सरकारी कार्यक्रमातही त्यांची उपस्थिती नसल्याने या चर्चांना जोर आला आहे. परंतु, अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याचे कारण देत ही चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान, या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे सर्वोसर्वा उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नांदेड मृत्यूप्रकरणी आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार नाराज होऊन आपल्या पद्धतीने कामं करून घेतात का? असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझ्यावेळेला त्यांची अशी नाराजी मी पाहिली नव्हती. माझ्यावेळेला ते माझ्यासोबत चांगले होते. पण, ते चांगलं काम करत होते म्हणून ज्यांच्या पोटात दुखत होतं त्यांच्या उरावर अजितदादा आता बसलेले आहेत. त्यामुळे खरं अजितदादा ज्यांच्यामुळे उरावर बसलेत त्यांनी नाराज व्हायला पाहिजेत. आणि ज्यांनी त्यांना बसवलंय त्यांच्याही ते उरावर बसलेत त्यामुळे त्यांनीही नाराज व्हायला पाहिजे.”

हेही वाचा >> नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “खेकड्यांच्या हातात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार नाराज?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित होते. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच सायंकाळी केंद्रातील भाजप नेत्यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला रवाना झाले होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीहून राज्यात दाखल होताच पालकमंत्री पदाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्री पद मिळालं. मात्र, त्यानंतरही अजित पवारांनी अद्यापही माध्यमांशी संवाद साधलेला नाही.