Ajit Pawar angry on NCP workers in Wardha : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार हे सध्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येथील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झालेल्या अजित पवारांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. मात्र, स्वागताच्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन पिशवी जमिनीवर फेकून देणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी फटकारल्याचं पाहायला मिळालं. “तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? तुमच्या अशा कृत्यामुळे लोक शिव्या देतात”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. तसेच कार्यकर्त्याने जमिनीवर फेकून दिलेली पिशवी त्यांनी स्वतःच उचलली.

अजित पवार यांनी यापूर्वी अनेक वेळा पक्षाच्या बैठका, मेळावे व सभांमधून कार्यकर्त्यांना, पदाधिकारी व लोकांना सांगितलं आहे की “माझ्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन येत जाऊ नका. पुष्पगुच्छा, हार-तुरे ज्या पिशव्यांमधून आणता त्या पिशव्या कुठेही टाकू नका, कचरा करू नका, माझ्या पायांना स्पर्श करून नमस्कार करत जाऊ नका”. तरीदेखील अजित पवारंचे कार्यकर्ते या गोष्टी करताना दिसतात. त्यानंतर अजित पवार सर्वांसमोर त्यांची नाराजी देखील व्यक्त करतात. आज (२१ ऑगस्ट) वर्ध्यातील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तीच चूक केली. परिणामी या कार्यकर्त्याला अजित पवारांच्या रोषाचा सामना करावा लागला.

नेमकं काय घडलं?

अजित पवारांची कार कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच काही कार्यकर्ते त्यांच्या कारच्या दिशेने धावले. काहीजण त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करत होते. त्यावेळी अजित पवार त्यांना म्हणाले, “माझ्या पाया पडू नका. मला हे आवडत नाही.” त्यानंतर कार्यकर्त्यांनी पिशवीतून पुष्पगुच्छ काढला. त्यावर अजित पवार म्हणाले, “कचरा करू नका… सगळा वेड्याचा बाजार आहे… घे ती पिशवी इकडे.” अजित पवार सूचना करत असतानाही कार्यकर्त्याने हातातली पिशवी जमिनीवर टाकली. त्यानंतर अजित पवार अधिक संतापले.

कार्यकर्त्याने जमिनीवर टाकलेली पिशवी स्वतः उलचत अजित पवार म्हणाले, “तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे? उचल ती पिशवी, उगाच घाण करता. १०० वेळा सांगतो, पिशव्या खाली टाकू नका. लोक शिव्या देतात. तरी हे पिशव्या आणतात आणि टाकतात.”