Ajit Pawar : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना उलटून गेला आहे. या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार आहे, तसंच या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप ज्याच्यावर होतो आहे त्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. धनंजय मुंडे नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का? हे विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.

वाल्मिक कराडवर मकोका, परळीत आंदोलन

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका दाखल करण्यात आला असून त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलं आहे. यानंतर परळीत आंदोलन पाहण्यास मिळालं. वाल्मिक कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आई आणि पत्नीही या ठिय्या आंदोलनात सहभागी होत्या. यावेळी त्याच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना, वाल्मिक कराडवरचे आरोप फेटाळून लावले आहेत. मनोज जरांगे जातीयवादी माणूस आहे असाही आरोप वाल्मिक कराडच्या पत्नीने केला.

सुरेश धस यांनी काय म्हटलं आहे?

वाल्मिक कराडवर मकोका दाखल केल्यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोणत्या गुन्ह्यात मकोका दाखल केला, याची मला माहिती नाही. पण संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे सहभागी असतील त्यातील कुणालाच सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे इतर आता कुणाच्या मागण्यांना काही अर्थ नाही. एसआयटीने नियमाप्रमाणे कडी जोडलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर काय म्हणाले अजित पवार?

“जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा.. असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीने दोषींवर कारवाई करत आहेत.” असं विधान अजित पवारांनी केलं आहे. “मी इतकं स्पष्ट सांगतो, सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहिती आहेत. मी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून कधीही जाती-पातीचा, नात्या-गोत्याचा विचार केलेला नाही. महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे, कायदा-सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, प्रत्येकाने आपआपली जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण आहेत? कसे वागतात? कसे बोलतात. लोकांशी कसे संबंध ठेवतात. याचं पण भान आमच्यासहीत सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे. असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे.